
वर्धा जिल्ह्यामध्ये भाजप आणि वंचितला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळात वाढ झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वाशिम येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेचे बळ वाढले आहे. स्थानिक पातळीवर पक्ष बळकट करण्यासाठी या पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये वर्धा जिल्ह्यातील भाजप आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाचे प्रदेश संघटक सचिव अभिजीत फाळके यांच्या पुढाकाराने वर्धा जिल्ह्यातील इतर पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. वर्धा जिल्ह्यातील पक्ष संघटना बळकट करण्यासाठी हा पक्ष प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
वर्धा जिल्ह्यात ज्यांना जनाधार आहे. त्यांना संधी देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे नव्या जुन्या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे पक्ष संघटना बळकटीसाठी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी भवन मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक रुपचंद टोपले, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे माजी विदर्भ अध्यक्ष महेश मुडे, भाजपा व्यापारी आघाडी वर्धाचे जिल्हाध्यक्ष राकेश मंशानी, आरपीआयचे जिल्हा महासचिव कैलास सेलकर, बसपाचे माजी विधानसभा अध्यक्ष नागसेन थूल तसेच इतर असंख्य पदाधिकार्यांनी पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्षाचे प्रदेश संघटक सचिव अभिजीत फाळके यांच्या पुढाकाराने आज वर्धा जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. #NCP #पक्षप्रवेश pic.twitter.com/tAb6bnlsiB
— NCP (@NCPspeaks) June 2, 2022
अजित पवारांच्या उपस्थितीत वाशिम BJP पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या पुढाकाराने भाजप पक्षातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाजपचे माजी नगराध्यक्ष भगवानराव क्षीरसागर, किरण क्षीरसागर, तालुकाध्यक्ष गजानन दहातोडे, कपिल नकवाल, अनिल अग्रवाल यांनी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. दरम्यान नवी मुंबईतील जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या पुढाकाराने आप पक्षातील दत्तात्रय नागरे ( माजी सह आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले. त्यांच्यासमवेत सचिन सावंत, चंद्रकांत पाटील यांनीही पक्षात प्रवेश केला.
हेही वाचा : काळजी घ्या! राज्यात आजही हजारपेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधितांची नोंद, एकाचा मृत्यू