वारली चित्रकार मनीषा बोरसे यांनी साकारले विश्वविक्रमी शिवचरित्र

शिवजयंतीला १९ लघू वारली चित्रांची विश्वविक्रमी नोंद

नवीन नाशिक : इंदिरानगर येथील सुखदेव प्राथमिक मराठी विद्यामंदिर शाळेतील उपशिक्षिका मनिषा बोरसे-पाटील यांनी छत्रपती शिवजयंतीचे औचित्य साधून १९ लघू वारली चित्रे काढून विश्वविक्रमात नोंद केली. मनिषा बोरसे-पाटील यांना या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र व पदक माजी खासदार, स्वराज्य संघटना प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या वारली चित्रात शिवरायांचे बालपण ते राज्याभिषेकापर्यंतचे महत्त्वाचे १९ प्रसंग वारली चित्रशैलीत प्रत्येकी ४ बाय ४ सेंटीमीटर इतक्या लहान कागदावर त्यांनी रेखाटन केले आहे. यात आरमार स्थापना व राज्याभिषेक सोहळा इत्यादी घटनांची चित्रे समाविष्ट आहेत. वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॅार्डमध्ये लघू वारली चित्र या मथळ्याखाली सदर विक्रमाची नोंद झाली आहे.

यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे, स्वराज्य संघटना प्रवक्ते करण गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी सदर विश्वविक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेऊन मनीषा बोरसे यांचे कौतुक केले. उपशिक्षिका मनिषा बोरसे यांच्या या विश्वविक्रमी यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा रत्नाबाई काळे, सरचिटणीस संजय काळे, मुख्याध्यापक नितीन पाटील व प्राचार्य बाबासाहेब खरोटे यांनी अभिनंदन केले.

प्राचीन आदिवासी वारली चित्रशैलीचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणुन गेली १० वर्ष वेगवेगळया शाळेत मोफत वारली चित्रशैली कार्यशाळा घेत असतांना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली कि आदिवासी बांधव त्यांचे सण,उत्सव व देवतांना आपल्या विशिष्ट चित्र शैलीत रेखाटत असतात.अठरापगड जातीतील लहान लहान घटकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिवन परिचय शिवजयंती निमित्त १९ लघु वारली चित्रात रेखाटण्याचा एक प्रयत्न केला.
– मनीषा बोरसे- पाटील, उपशिक्षिका सुखदेव प्राथमिक मराठी विदयामंदिर,नाशिक