राज्यात अतिवृष्टीचा इशारा, आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात

केंद्रीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

heavy rain
धुवाधार पाऊस

केंद्रीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात एनडीआरएफच्या १३ आणि एसडीआरएफच्या दोन तुकड्यांचा समावेश आहे. या शिवाय राज्यात विविध ठिकाणी या दोन्ही दलांच्या नऊ कायमस्वरुपी तुकड्या तैनात केल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय हवामान खात्याकडून ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यात कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्य सकारने विविध ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात आठ जुलैपर्यंत रेड अलर्ड जारी करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात १५२ कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर –

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १५४.८९ मिमी पावसाची नोंद झाली. सद्यस्थितीत पूरस्थिती नाही. मात्र, खेड येथील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी, राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे व वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. दरडप्रवण व पूरप्रवण भागातील १५२ कुटुंबे म्हणजे ४७९ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन घरे जमीनदोस्त झाली. ६७ घरांचे अंशतः नुकसान झाले. एकूण ५१ गावे बाधित झाली आहेत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ घरांचे नुकसान –

गेल्या २४ तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५५ मिमी पावसाची नोंद झाली. कुठेही पूरस्थिती नसल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. जिल्ह्यात एका घराचे पूर्णतः, तर १४ घरांचे अंशतः नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून रायगडमध्ये एक एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे.

या ठिकाणी एनडीआरएफची पथके तैनात –

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत कांजुरमार्ग आणि घाटकोपर येथे दोन एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय पालघर येथे एक, रायगड-महाड येथे दोन, ठाण्यात दोन, रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये दोन, कोल्हापूरमध्ये दोन, साताऱ्यात एक, सिंधुदुर्ग येथे एक अशी १३ पथके राज्यभरात तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय नांदेड आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. मुंबईत तीन, पुण्यात एक, नागपुरात एक अशा एकूण पाच एनडीआरएफच्या, तर धुळे येथे दोन, नागपुरात दोन अशा चार एसडीआरएफच्या कायमस्वरूपी तुकड्या तैनात केल्या आहेत.

कोल्हापूर जिल्हातील कांडवण धरण पूर्ण भरले

कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कांडवण धरण पूर्ण भरले आहे. 5.11 द.ल.घ.मी क्षमतेचे हे धरण असून शाहूवाडी तालुक्यात चार दिवसांपासून जोरदार पाऊस सूरु आहे. कणसा खोऱ्यातील गावांसाठी हे धरण वरदान ठरते. मात्र, आता या धरणाच्या सांडव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी नदी पात्रात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागांत रात्रभर पावसाची संततधार, बळीराजा सुखावला

बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागांत रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. सकाळी मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यात खरिपाच्या 86 टक्के पेरण्या झाल्या असल्याने हा पाऊस शेतीसाठी पूरक असल्याने शेतकरी आनंदात आहे. जिल्ह्यातील पूर्णा नदीला मोठा पूर आला असून सातत्याने नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने एक जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन पथक तयार ठेवले आहे.