घरताज्या घडामोडीवाहनधारकांनो सावधान : नो पार्किंगमधील वाहने होणार टोईंग

वाहनधारकांनो सावधान : नो पार्किंगमधील वाहने होणार टोईंग

Subscribe

वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या नो पार्किंगमधील वाहने हटविण्यासाठी आता टोईंग व्हॅन नियुक्त करण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांसाठी हे काम एका ठेकेदाराला देण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी १५ दिवसांत हरकती नोंदवण्याच्या सुचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत. यंदा टोइंग कारवाईत दुचाकी चालकास २९०, तीनचाकी चालकांस २०१ व चारचाकी चालकाना ५५० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

टोईंग व्हॅन सर्व्हिस मागील वर्षापासून बंद करण्यात आली होती. या कारवाईसाठी ज्या कंपनीला ठेका देण्यात आला होता त्या कंपनीच्या कर्मचार्‍यांचे वाहनचालकांबरोबरचे गैरवर्तन, नियमबाह्य कारवाई, आर्थिक गैरव्यवहार यामुळे नागरिक आणि व्हॅनवरील कर्मचार्‍यांमध्ये होणारे वाद नित्याचे झाले होते. त्यामुळे ऑक्टोबर २०२१ ला टोइंग कारवाई बंद करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा वाहतूक पोलिसांनी टोइंग कारवाई सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कायदेशीर बाबींची पूर्तता करुन शहर वाहतूक पोलिसांनी श्रमसाफल्य सर्व्हिसेस कंपनीस टोइंगचा ठेका दिला असून काही दिवसांतच कारवाईस सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी पोलिसांनी नागरिकांकडून १५ दिवसांच्या आत हरकती मागवल्या आहेत. त्यासाठी नागरिकांनी पोलीस आयुक्त कार्यालयातील तळमजल्यावर शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात लेखी हरकती देण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

 

असा असेल दंड
दुचाकी वाहनांसाठी टोइंग कारवाई ९० व शासकीय तडजोड शुल्क २०० असे एकूण २९० रुपये दंड असेल. तर तीनचाकी वाहनांसाठी टोईंगचा दर १ रुपया व शासकीय तडजोड शुल्क २०० रुपये असा एकूण २०१ रुपयांचा दंड राहणार आहे. तर चारचाकी वाहनांसाठी टोइंग दर ३५० व शासकीय तडजोड शुल्क २०० असा एकूण ५५० रुपयांचा दंड राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -