मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. याच अनुषंगाने जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. मात्र यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या घटनेबाबत भाजपा आमदार नितेश राणे यांनी, संशय व्यक्त करून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काल रात्री छत्रपती संभाजीनगरला कुठल्या उबाठा नेत्याच्या जवळच्या लोकांनी गाड्या जाळल्या ??
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सतत राज्यात दंगली होणार हे सांगत होते..
मग हीच ती दंगल होती का?
यांची चौकशी झाली पाहीजे !!— nitesh rane (@NiteshNRane) September 2, 2023
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. काल, शुक्रवारी पोलिसांकडून या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. पोलिसांकडून गोळीबार देखील करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. या घटनेचे हिंसक पडसाद आता राज्यातील विविध भागांमध्ये उमटायला सुरुवात झाली असून या प्रकरणामुळे अनेक जिल्ह्यांत बंदची हाक देण्यात आली आहे.
हेही वाचा – “इथे सरकारचं चुकलं हे निश्चित..” जालन्याच्या घटनेवर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
या घटनेवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावात निघणारे हिंदू मोर्चे हे काँग्रेस आणि विरोधकांचे खरे दुखणे आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद यासारखे मुद्दे यांना अडचणीचे आहेत. कारण हे ज्या जिहादी लोकांना पोसतात तेच अडचणीत यायला लागले आहेत. हिंदू सामाज जागा होतो आहे आणि ते यांना परवडणारे नाही. म्हणून हिंदू समाजाला जाती-जातीमध्ये झुंजवत ठेवायचे आणि आपल्या जिहादी आकांना खूश ठेवायचे, हाच खरा कार्यक्रम आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
हेही वाचा – Jalna Maratha Protest : जालन्यातील घटना म्हणजे…, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे सतत राज्यात दंगली होणार हे सांगत होते. मग हीच ती दंगल होती का? यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.