SIT For Fake Case Conspiracy : मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारमधील अन्य नेत्यांना कथितरित्या खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याचा कट रचल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. 30 दिवसांच्या आत या प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल सरकारला सादर करायचा आहे. त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. (was there a plan to send fadnavis shinde to jail in a fake case sit formed to investigate the conspiracy)
व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या दाव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या एका स्टिंग ऑपरेशनच्या हवाल्याने पुनामिया यांनी हा दावा केला होता. या अंतर्गत एका माजी पोलीस अधिकाऱ्याने टेलिफोनवरील संभाषणात तत्कालीन विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणि मविआतील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेची योजना असल्याचे संकेत दिले होते.
हेही वाचा – IND VS ENG : चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंड फलंदाजांची निराशा, भारताने मालिका जिंकली
ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी या विशेष तपास पथकाची (SIT) घोषणा केली. ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात या SIT ची स्थापना करण्यात आली. या दरम्यान, भाजपाचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील विधान परिषदेत एक पेन ड्राईव्ह सादर केला होता. यात कथित स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ असल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकरणाचा तपास निष्पक्षरित्या केला जावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जात त्यामागचे खरे सूत्रधार शोधून काढायला हवेत, असेही ते म्हणाले.
SIT स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. गेली तीन वर्षे महायुती सरकार सत्तेत आहे. मग अचानक हे प्रकरण पुन्हा बाहेर काढण्याचे काय प्रयोजन आहे, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. विरोधकांनी ही राजकीय खेळी असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा – Five Day Banking Week : बँकेचा पाच दिवसांचा आठवडा? बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता