ठाकुर्लीत कचरा जाळल्यामुळे धूर कोंडी

रुग्णांच्या आरोग्याला धोका

plastic-waste-
प्रातिनिधिक चित्र

डोंबिवली । ठाकुर्ली परिसराचा गेल्या काही वर्षात झपाट्याने कायापालट होत आहे. मात्र या भागात नागरी सुविधांच्या समस्याही तितक्याच प्रमाणात रहिवाशांना जाणवत आहेत. ठाकुर्ली रोडवर अज्ञात व्यक्तींकडून कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे तेथे नवीन डम्पिंग ग्राऊंड निर्माण झाले आहे. या डम्पिंगवरील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी या कचर्‍याला आग लावली जाते. कचर्‍यातून निघणार्‍या धुरापासून प्रदूषण तर होतेच दुसरीकडे जळणार्‍या या कचर्‍यापासून नागरीवस्तीला धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाकुर्ली रोडवर असलेल्या ओंकार सीबीएससी शाळेसमोरच्या रोडवर दररोज उघड्यावर कचरा टाकला जातो .त्याचबरोबर त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी तो चुकीच्या पद्धतीने जाळला जातो. विशेष म्हणजे जवळच हॉस्पिटल देखिल आहेत. त्यामुळे या कचर्‍याचा त्रास स्थानिक रहिवासी,शाळेचे विद्यार्थी आणि हॉस्पिटलमधील रूग्ण, त्यांचे नातेवाईक, उपचार करणारे डॉक्टर व कर्मचार्‍यांना सहन करावा लागतो.हि बाब लक्षात घेवून या भागात राहणार्‍या मंदार अभ्यंकर या जागरूक तरूणाने या संदर्भात शासन व प्रशासनाचे ट्विट करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे. केडीएमसी, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री कार्यालय, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छता सर्वेक्षणासह प्रदूषण नियंत्रण मंडळालाही टॅग करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात कचर्‍याची समस्या गंभीर झाली आहे. हा कचरा ज्याठिकाणी टाकला आणि जाळला जातो ,त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लहान-मोठी झाडे-झुडपे आहेत. ती वृक्षवल्ली आणि त्यावर अवलंबून असलेल्या पशू-पक्षांना त्याचा त्रास होत असतो .तसेच या परिसरात राहणार्‍या अबाल-वृद्धांना जळणार्‍या कचर्‍यापासून निघणार्‍या धुरामुळे खोकला, मळमळ होते .कधी कधी श्वास घेणेही अवघड होते.त्यामुळे महापालिकेने ओला-सुका कचरा वर्गीकरण करणे हि मोहिम गुंडाळली की काय ? असा सवाल मंदार अभ्यंकर यांनी उपस्थित केला आहे. या कचर्‍यापासून आग भडकल्यास इथे असलेल्या शाळा, दवाखाना, रहिवाशी इमारतींमध्ये मोठी आग लागून दुर्घटना होऊ शकते, अशीही भीती अभ्यंकर याने व्यक्त केली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांना विचारले असता , सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्यात येईल . या संदर्भात ठाकुर्ली परिसराचे स्वच्छता अधिकारी यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. उघड्यावर कचरा टाकून जाळणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल सांगितले.