घरमहाराष्ट्रकाळजी घ्या : जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार; 'या' देशातून येणाऱ्या...

काळजी घ्या : जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार; ‘या’ देशातून येणाऱ्या प्रवाशांची होणार चाचणी

Subscribe

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. मुंबईत वाढणारी कोरोना रूग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवला आहे. याशिवाय मुंबईतील दोन रुग्णालयांसह तीन ठिकाणी पुन्हा एकदा जम्बो कोरोना केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणीही पुन्हा सुरू होणार आहे.

मुंबईत सातत्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर टास्कफोर्सची शुक्रवारी आढावा बैठक पार पडली आणि सर्व कोरोना रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच धरतीवर मुंबई महापालिकेने आढावा बैठक घेऊन मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय आणि आणखी एका ठिकाणी जम्बो करोना केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दुबई आणि चीनमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

- Advertisement -

रुग्णालयात मास्क बंधनकारक
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आता असे समजते की, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येण्याच्या संख्येतही 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यामध्ये शुक्रवारी 425 नवे रुग्ण आढळून आले असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3090 वर पोहोचली आहे. त्यामुळे डॉक्टर, कर्मचारी यांच्यासह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयामध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येण्याचा रेट वाढल्याने चिंता
सध्या कोरोना रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह येण्याच्या संख्येत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. चार आठवड्यांपूर्वी राज्यातील रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह येण्याचा रेट 1.5 टक्के इतका होता, तर गेल्या आठवड्यात हाच रेट 6.15 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे पालिकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह रेट 20.5 टक्के, सांगली 17.47 टक्के, कोल्हापूर 15.35 टक्के, पुणे 12.33 टक्के, नाशिक 7.84 टक्के आणि अहमदनगर 7.56 टक्के इतका असल्यामुळे खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

इन्फ्ल्युएंझाचे 3 लाखांच्यावर संशयित रुग्ण
राज्यात 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत इन्फ्ल्युएंझाचे 3 लाख 58 हजार 73 संशयित रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांना ऑसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आले आहे. यामध्ये ‘एच 1 एन 1’चे 451, तर ‘एच 3 एन 2’चे 358 रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -