घरताज्या घडामोडीमुंबईत २७ जूनपासून १० टक्के पाणीकपात; तलावांत फक्त १० टक्के पाणीसाठा शिल्लक

मुंबईत २७ जूनपासून १० टक्के पाणीकपात; तलावांत फक्त १० टक्के पाणीसाठा शिल्लक

Subscribe

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात सरासरी ७० टक्के कमी पाऊस पडला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात सरासरी ७० टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत तलावांत १,४१,३८७ दशलक्ष लिटर इतका कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने व अपेक्षित पाऊस न पडल्याने अखेर पालिकेने २७ जूनपासून दररोजच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. (water cut in Mumbai from June 27 Only 10 percent water is left in the lake)

मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महापालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही १० टक्के कपात लागू राहणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना दररोज ३,८५० ऐवजी ३,४६५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होणार आहे. तलावातील शिल्लक पाणीसाठा व दररोज होणारा पाणीपुरवठा यांचे गणित केल्यास मुंबईला पुढील ४० दिवस म्हणजे येत्या २ ऑगस्टपर्यन्त पुरेल इतका आहे. मुंबईकरांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मुंबईतील कमी क्षमतेच्या दोन तलावांत व मुंबई बाहेरील पाच मोठया तलावांत म्हणजे एकूण सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. पावसाळा संपल्यावर म्हणजे १ ऑक्टोबर रोजी पालिकेकडून तलावातील पाणी साठ्याचा आढावा घेतला जातो. त्यानुसार मुंबईला पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असणे आवश्यक असते. मात्र तलावांत अपेक्षित पाणीसाठा नसेल व तो खूप कमी असेल तर पालिका प्रशासन पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेते.

त्याचप्रमाणे, पावसाळयात अपेक्षित पाऊस जून अखेरपर्यन्त न पडल्यास सात तलावातील शिल्लक पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पालिका प्रशासन पाणी कपात करण्याचा निर्णय घेते. त्यानुसार पालिका पाणी खात्याने यंदा जून महिन्याच्या अखेरीस तलावातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन २७ जूनपासून दररोज होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

यंदा देशात चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र मुंबई व मुंबईच्या परिसरात म्हणजे ठाणे व नाशिक जिल्ह्यात या जुनअखेरपर्यन्त अपेक्षित पाऊस पडलेला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत खूप कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात वाढ न होता झपाट्याने घट होत आहे. तलावातील पाण्याची पातळी तळ गाठू लागली आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता मुंबई महापालिकेने अखेर चांगला पाऊस पडेपर्यंत व तलावातील पाणीसाठ्यात अपेक्षित पाण्याची वाढ होईपर्यन्त २७ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

२३ जूनपर्यंत सात तलावातील पाऊस व पाणीसाठा

तलाव         तलावात पडलेला          पाणीसाठा
                पाऊस, मिमी             दशलक्ष लि.

उच्च वैतरणा     ७९.००                     ०

मोडकसागर      १६०.००                ४७,०७८

तानसा           २३३.००                 ७,९२७

मध्य वैतरणा    १७४.००                 १८,०१३

भातसा          २७३.००                 ६२,४४६

विहार            २४७.००                 ३,८३२

तुळशी           २७८.००                 २,०९२

  • एकूण पाऊस १,४४४.००
  • एकूण पाणीसाठा १,४१,३८७

हेही वाचा – शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई, ७८ कोटींच्या संपत्तीवर टाच

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -