Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शहरात पाणी कपात ; धरणातून मात्र विसर्ग

शहरात पाणी कपात ; धरणातून मात्र विसर्ग

Related Story

- Advertisement -

नाशिक । शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरण परिक्षेत्रात संततधार पाउस सुरू असल्याने धरण ७५ टक्के भरले आहे. पावसाची संततधार सुरू असून ऐनवेळी मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ नये याकरीता गंगापूर धरणातून गुरूवारी सकाळी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. मात्र एकिकडे शहरांत पाणी कपात सुरू असतांना दुसरीकडे मात्र पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासनाच्या एकूणच भुमिकेबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक शहर आणि जिल्हयाच्या पश्चिम पटटयात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे धरण साठयात मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. भावली धरण भरले असून धरणातून २०८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच दारणा धरणही भरले असून दारणातून तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच नांदुरमध्येमेश्वरमधूनही सुमारे पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापुर धरण ७५ टक्के भरले असून गुरूवारी गंगापुरमधूनही ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी गंगापुर धरणाने तळ गाठल्याने शहरात आठवडयातून एकदा पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. गंगापुर धरण आणि समुहात ५० टक्के पाणी साठा उपलब्ध होईपर्यंत पाणी कपात सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार गेल्या आठवडयापासून पाणी कपात सुरूही करण्यात आली. आजही शहरात पाणी कपात करण्यात येत आहे. मात्र आता गंगापुर धरणात ७२ टक्के तर समुहात ६३ टक्के पाणीसाठा असतांनाही पाणी कपात सुरूच ठेवण्यात आली आहे. असे असतांना दुसरीकडे मात्र गंगापुरमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने या एकूणच भुमिकेविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशासन सतर्क
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. येथील गावच्या गावे पाण्याखाली आहेत. काही तासांत मोठया प्रमाणावर पाऊस पडल्याने धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग आणि पावसामुळे गावात पाणी साचल्याने या ठिकाणी महापूराची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे साधारणतः धरण ६० टक्के भरल्यानंतर पावसाचा कालावधी विचारात घेता पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जातो. जिल्हयातील धरणांत पाण्याची आवक होत असल्याने एकाच वेळी मोठया प्रमाणावर पाणी सोडावे लागून पूर परिस्थिती निर्माण होऊ नये याकरीता प्रशासनान सर्तक झाले असून याच पार्श्वभुमीवर धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

- Advertisement -