…म्हणून आपल्यावर प्रहार केला जातोय, जयंत पाटील यांचे भाजपावर शरसंधान

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात जास्त चर्चेत असलेला पक्ष आहे. भाजपाला खात्री आहे हा पक्ष राज्यात काहीही करू शकतो. त्यामुळे आपल्यावर प्रहार केला जात आहे. येत्या काळात आपल्यावर अनेक अधिक प्रहार होतील, आपण मात्र घाबरून जायचे नाही. लढा देणे, संघर्ष करणे हे आपले कर्तव्य आहे. 2024ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा इतिहास घडवेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची राज्यस्तरीय बैठक आज जयंत पाटील व पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पार पडली. जयंत पाटील यांनी, या बैठकीत महिलांना संबोधित करताना, देशभरात आणि राज्यभरात अनेक घटना घडत असल्याने लोकांचा आज उद्रेक होत आहे. या गोष्टीबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने हाती घेतलेला जन जागरण यात्रा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.

नुसते हायवे झाले म्हणजे विकास झाला असे या सरकारला वाटते. महागाई, रोजगार हा विषय सरकारला महत्त्वाचा वाटत नाही. यासाठी सर्व भगिनींनी पुढे यायला हवे. या सरकारविरोधात आवाज उठायला हवा. जिल्ह्याजिल्ह्यात, गावागावात हा उपक्रम यशस्वी करायला हवा, असे आवाहन करून जयंत पाटील म्हणाले, प्रसारमाध्यमे आपली भूमिका लावून धरतील, अशी अपेक्षा ठेवू नका. मात्र समाजमाध्यमावर आपल्या या उपक्रमाची जोरदार प्रसिद्धी करा. हे सरकार कशाप्रकारे सत्तेत आले आहे हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. त्यामुळे आपण या गोष्टीचा प्रचार करून लोकांसमोर यांची फसवेगिरी उघडी पाडावी.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रक्ताचे पाणी करून हा पक्ष येथपर्यंत आणला आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंध राहून काम करावे. एखादी महिला पक्ष सोडत असेल तर त्यांची विचारपूस करा, त्यांचे मत बदला, प्रत्येकाचा मान राखा, असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिलाध्यक्षा खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि माजी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार सुमन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, राज्य महिला निरीक्षक आशा मिरगे, आशा भिसे, राज्य महिला समन्वयक सुरेखा ठाकरे, विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, वैशाली मोटे, कविता म्हेत्रे, शाजिया शेख, वर्षा निकम, शाहीम हकीम, अर्चना घारे आदींसह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.