आम्हाला बोलावताना भाजपशीही चर्चा करावी लागेल

दीपक केसरकरांकडून समेटाची भाषा

DEEPAK KESARKAR

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावले तर आम्ही नक्की जाऊ, पण आम्ही आता भाजपसोबत सत्तेत आलो असून एक नवीन कुटुंब तयार झाले आहे. या कुटुंबामधून परत जायचे असेल तर आम्ही एकटे नाही. आम्हाला बोलावताना त्यांना भाजपशीही चर्चा करावी लागेल, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी गुरुवारी करीत सर्वांनाच गोंधळात टाकले. त्याआधी आमच्यासाठी मातोश्रीचे दारे सन्मानाने उघडली तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असे विधान आमदार संजय राठोड यांनी केले होते. या वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदार स्वगृही परतण्यासाठी समेटाची भाषा तर करीत नाहीत ना, अशी शंका उपस्थित होत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केला. यावेळी आयोजित पूजेसाठी दीपक केसरकरदेखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जर तुम्हाला परत बोलावले तर तुमची भूमिका काय असेल, असे पत्रकारांनी केसरकरांना विचारले असता ते म्हणाले की, ज्याप्रकारे आमच्यावर आरोप करीत आहेत, पक्षातून काढले आणि दुसरीकडे चर्चेसाठी माणसे पाठवली. आमचे पुतळे जाळण्यात आले. आमची बदनामी करण्यात आली. खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. ते पाहता त्यांना अशी अपेक्षा असेल असे वाटत नाही. तरीही उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावल्यास आम्ही नक्की जाऊ. आम्ही थेट उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू. या चर्चेवेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आजूबाजूचे लोक बाहेर ठेवावेत.

पण आता भाजप-सेना युती झाली आहे. आम्ही भाजपसोबत सत्तेत आलो असून एक नवीन कुटुंब तयार झाले आहे. या कुटुंबामधून परत जायचे असेल तर आम्ही एकटे नाही. आम्हाला बोलावताना त्यांना भाजपशीही चर्चा करावी लागेल, आशीर्वाद द्यावा लागेल. ते लव्ह मॅरेजसारखे आहे. त्या जोडप्याला पुन्हा घरी यायचे असेल तर दोघांच्या घरातील प्रमुखांनी आधी एकमेकांशी चर्चा करावी लागेल. आम्हाला परत बोलवायचे असेल तर उद्धव ठाकरे यांना भाजपच्या प्रमुखांशी बोलावे लागेल, अशी अटही केसरकर यांनी घातली.