बुलढाणा : जालन्यातील अंतरावली सराटी मराठा आंदोलकांवर शुक्रवारी (1 सप्टेंबर) पोलिसांनी लाठीचार्ज केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी याठिकाणी आंदोलक चार दिवसांपासून उपोषण करत होते. पण त्याचवेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाज आक्रमक झाला. आता या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अनेक जिल्ह्यांत आंदोलनं करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जालन्यातील दुर्दैवी घटनेवर आपली भूमिका स्पष्ट करताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहेत. ते आज बुलढाणा जिल्ह्यात शासना आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. (We sent the Superintendent of Police on compulsory leave along with the Maratha agitators Opposition should not play politics Chief Minister)
एकनाथ शिंदे म्हणाले की, जालन्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. फक्त देतो म्हणून दाखवण्यासाठी आम्ही काम नाही करणार नाही तर, मराठा समाजाला भक्कम टिकणारं आरक्षण देईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही, मी स्वस्थ बसणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधताना म्हटले की, मराठ आरक्षण कसं देणार आणि त्यासाठी काय करणार हे मी आता सांगणार नाही. नाहीतर विरोधी पक्ष त्याच्यामध्ये अजून काड्या करण्याचं काम सुरू करतील. पण मी तुम्हाला सांगतो लवकरच या मराठा समाजाला न्याय मिळेल. त्याच्या हक्काचं आरक्षण मिळेल. हा माझा शब्द आहे आणि आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
मनोज जरंगे पाटील यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले
जालन्यात आंदोलनकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज दुर्दैवी आहे. मी स्वतः तुम्हाला आंदोलनकर्ते मनोज जरंगे पाटील यांच्याशी तीन दिवसापूर्वी स्वतः फोनवर बोललो होतो. त्यांना विनंती केली होती, तुमची तब्येत खालावली आहे. तुम्ही रुग्णालयात दाखल व्हा. आम्हाला त्यांची, त्यांच्या जीवाची काळजी होती. त्याच्यासोबत तीन चार बैठका केल्या आहेत. त्याचा जो मुद्दा आहे, त्याच्यावर काम देखील सुरू आहे. परंतु दुर्दैवाने जी घटना व्हायला नको ती घडली.
पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले
जालना दुर्घटनेनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय मी घ्यायला सांगितला आहे.
त्याचबरोबर डीवायएसपी यांना तत्काळ जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. तसेच नवीन पोलीस अधीक्षक सक्सेना उद्याच जालनामध्ये येतील आणि चौकशी करतील. यानंतर जे दोषी आढळतील त्यांना निलंबित करण्यात येईल. वेळ पडली तर न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
सर्वसामन्यांना केली विनंती
जालना घटनेनंतर राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राजकीय आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेप्रकरणी राजकारण करू नये, अशी त्यांनी विनंती केली आहे. तसेच विरोधकांवर निशाणा साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, जे राजकीय पोळी भाजू इच्छितात, मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम काही लोकं करत आहेत, त्यांना बळी पडू नका. हे सरकार तुमचं आहे. हे सरकार सर्वसामान्या माणसाचं आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही कधीही अंतर येऊ देणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
- Advertisement -
- Advertisement -