किमान मृतदेहाची तरी विटंबना करू नका

वैभववाडी तालुक्यात एखाद्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करण्यासाठी फार मोठी अडचण निर्माण होते. यामुळे मृतदेहाच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे किमान मृतदेहाची तरी विटंबना करू नका अशी खंत सभापती लक्ष्मण रावराणे यांनी वैभववाडी पंचायत समितीच्या मासिक सभेच्या वेळी व्यक्त केली आहे.

Dead body

वैभववाडी तालुक्यात एखाद्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करण्यात येते. मात्र शवविच्छेदन करण्यासाठी फार मोठी अडचण निर्माण होते. शवविच्छेदन करण्यासाठी जाणाऱ्या नातेवाईकांचे यावेळी प्रचंड हाल होतात. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी काय करावे हा प्रश्न उपस्थित होतो. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमारे आणि डॉ.जाधव हे नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी झटकून मोकळे होतात. त्यामुळे मृतदेहाच्या नातेवाईकांना या अडचणीला सामोर जावे लागते. त्यामुळे जिवंत माणसांना सेवा देता येत नाही तर किमान मृतदेहाची विटंबना तरी करू नका. अशी खंत सभापती लक्ष्मण रावराणे यांनी वैभववाडी पंचायत समितीच्या मासिक सभेच्या वेळी व्यक्त केली आहे.

पाणी टंचाईविषयी नाराजी

वैभववाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत वेगवेगळे विषय मांडण्यात आले. यावेळी पाणी टंचाईचा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. पाणी टंचाई आराखड्यावर चर्चा करताना सभापती रावराणे यांनी पाणी टंचाई आराखड्याच्या अमंलबजावणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जर कामे मंजूर होत नसतील तर टंचाई आराखडे तयार करून काय उपयोग असा सवाल देखील उपस्थित केला. गेल्या वर्षीची कामे प्रथम प्राधान्याने करावी. अशी सक्त सूचना त्यांनी केली. याला मंगेश लोके यांनी सहमती दर्शवत भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून वेळेवर सर्व्हे केला जात नाही त्यामुळे कामे देखील रखडतात. निधी असूनही भूजल दाखल्यामुळे कामे प्रलंबीत राहत आहेत. असा आरोप लोके यांनी यावेळी केला. यावर उत्तर देताना शाखा अभियंता गुरसाळे यांनी १५ पैकी ११ दाखले भूजलकडून दिले तर उर्वरीत लवकरच मिळतील असे देखील सांगितले आहे. तसेच सभेचे निमंत्रण देऊनही खातेप्रमुख पंचायत समितीच्या मासिक सभेत गैरहजर राहतात. अशा खातेप्रमुखांवर कारवाई करावी. अशी मागणी मंगेश लोके यांनी केली आहे. तर गटविकास अधिकारी परब यांनी संबंधित खातेप्रमुखांच्या वरिष्ठांना कळविण्यात येईल असे देखील सांगितले.