घरताज्या घडामोडीजिम सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक, जिम चालकांसमोर ठेवली 'ही' अट

जिम सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक, जिम चालकांसमोर ठेवली ‘ही’ अट

Subscribe

मिशन बिगिन अगेन आणि ‘पुनःश्च हरीओम’ अशा घोषणा देत राज्यातील अनेक व्यवसायांना पुन्हा सुरु करण्यात आलेले आहे. मात्र जिम खुली करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील जिम चालकांनी काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. मुंबईतील जिम चालकांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. “राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, जिम सुरु करताना कोरोनाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी सर्व जिमचालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहेत. ही तत्वे राज्यातील जिम चालकांनी एकत्रितपणे ठरवून शासनास सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबईतील जिम चालकांचे प्रतिनिधी महेश गायकवाड, निखिल राजपुरिया, करन तलरेजा, हेमंत दुधवडकर, गुरुजितसिंग गांधी, योगिनी पाटील, साईनाथ दुर्गे, रमेश गजरीया, मनोज पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

जिम सुरु करण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून चांगलेच राजकारण तापले होते. जिम मालकांनी सर्वात आधी राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. यावेळी राज ठाकरे यांनी ‘योग्य ती खबरदारी घेऊन जिम सुरु करा, मी बघतो काय होते ते’, असा पवित्रा घेतला होता. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जिम सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. महाविकास आघाडीमधीलच काही नेते जिम सुरु करण्याची मागणी रेटत होते. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे दिसले.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -