संघटन वाढवून युवकांचे विषय निकाली काढू : अमित ठाकरे

मालेगाव येथे मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांची विद्यार्थ्यांना साद

मालेगाव : युवावर्गाला जोडण्यासाठी महाराष्ट्र दौर्‍यावर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे मालेगाव शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पदाधिकार्‍यांना हात जोडत विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन केले. राज्यस्तरीय विषय पक्षश्रेष्ठी हाताळतीलच आपण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना हात घालू, संघटन वाढवून युवककेंद्री विषय निकाली काढू या, अशी साद घालत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली.

राज्यातील राजकीय उलथापालखीनंतर कमालीचे महत्व वाढलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे युवावर्ग मोठ्या संख्येने आकर्षित होत असल्याचा प्रत्यय ‘मनविसे’चे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या महासंपर्क अभियानाच्या निमित्ताने मालेगावकरांना आला. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील नियोजित दौरा करीत ठाकरे हे रविवारी (दि. ७) सायंकाळी मालेगाव शहरात दाखल झाले. मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे फाट्यावर त्यांचे शहराध्यक्ष राकेश भामरे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी स्वागत केले. तेथून भव्य दुचाकी रॅलीने ते शहरात दाखल झाले. मनमाड चौफुली, मोतीबाग नाका, मोसम पूलमार्गे ते रॉयल हब बिल्डींगजवळ पोहोचले. याठिकाणी पक्षाच्या नूतन संपर्क कार्यालयाचे ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी युवकांची प्रचंड गर्दी झाली होती. येथून थेट ज्योतीनगरमधील दुसाने मंगल कार्यालयातील सभास्थळी दाखल झाले. याठिकाणी पदाधिकार्‍यांना विनंतीपूर्वक बाहेर ठेवण्यात येऊन कोणताही अभिनिवेश न बाळगता थेट विद्यार्थ्यांमध्ये ठाकरे पोहोचले. स्वागत सत्कारात वेळ न दवडता थेट विषयाला हात घालत त्यांनी आगामी वाटचाल थोडक्यात स्पष्टपणे मांडली.

विद्यार्थ्यांशी एकरुप होण्याचा हा प्रवास आहे. त्यात पहिला टप्पा असेल महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र युनिट गठीत करणे. प्रत्येक विद्यार्थ्याला पक्षाचे पाठबळ उपलब्ध करुन दिले जाईल. प्रत्येकाच्या जीवनात नानाविध प्रश्न असतात. तसे विद्यार्थ्यांनाही प्रश्न भेडसावतात. बेरोजगारी, महागाई हे राज्यस्तरीय प्रश्न तर आहेच, ते वरिष्ठ स्तरावरुन हाताळले जातील. मात्र, मोठ्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न दुर्लक्षित राहता कामा नये, तेव्हा महाविद्यालयातील साफसफाई, शैक्षणिक शुल्क आदी प्रश्न हे विद्यार्थ्यांना नेहमीच सतावतात. ते एकट्याने सुटतील का? असा सवाल करित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या भावनांना हात घातला. एकट्याने उत्तर मिळणार नाहीत, तेव्हा आपण आपली ताकद दाखवू. प्रत्येक महाविद्यालयात मनविसेचे एक युनिट काम करेल. विद्यार्थी मित्रांशी संपर्क वाढवा, त्यांच्या समस्या जाणून घ्या, जास्तीत जास्त सहभाग वाढवून महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रश्न आपण सोडवू. याप्रकारे विषय मांडत त्यांनी विद्यार्थ्यांना जबाबदारी स्वीकारुन झोकून देण्याची साद घातली.

दुसर्‍या टप्प्यात प्रत्येक महाविद्यालयाच्या परिघात ‘मनविसे’ युनिटमधील सदस्य आणि पदाधिकार्यांचे संपर्क क्रमांक देण्यात येतील. त्याद्वारे विषयांचे आदानप्रदान करुन पुढील दिशा निश्चित करण्यात येईल, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थी संवादानंतर ठाकरे यांनी भावी मनसैनिकांसमवेत सेल्फी घेत स्नेहबंध जोडला. शेकडोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. कार्यक्रमानंतर ठाकरे हे नाशिकला रवाना झाले. यावेळी शहराध्यक्ष राकेश भामरे, तालुकाध्यक्ष अविनाश चव्हाण, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष चेतेश आसेरी, प्रवीण सोनवणे, मोहसीन शेख, किशोर गढरी, राहुल माऊली बच्छाव, रोहित साखला, पुरुषोत्तम जगताप, मुन्ना सूर्यवंशी, हरीश परदेशी, योगेश अहिरे, विशाल शेवाळे, भरत सूर्यवंशी, गणेश महाजन, हर्षल गवळी, केतन देवरे, प्रतीक शेवाळे, प्रवीण हिरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज ठाकरेंची पहिली सभा मालेगावातच

चांदवडनंतर मालेगावात आलेल्या अमित ठाकरे यांचे तरुणाईने जल्लोषात स्वागत केले. विद्यार्थी संवाद कार्यक्रमाला तरुणांची मांदियाळी दिसून आली. तरुणांचा हा उत्साह पाहून ठाकरे भारावून गेले. माईक हातात घेताच त्यांनी मालेगावातील या सळसळत्या उत्साहाचा आढावा राज ठाकरेंना सांगून त्यांना आगामी पहिली सभा मालेगावातच घ्यायला सांगेल, अशा शब्दात त्यांनी मालेगावच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संघटन विस्तार कार्याला पोहोचपावती दिली.