आणखी एका विरोधी पक्षनेत्याला भाजप चुचकारतंय?

chandrashekhar bawankule offer vijay wadettivar
चंद्रशेखर बावनकुळे यांची विजय वडेट्टीवर यांना ऑफर

महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या नाराजीनाट्यावर काही केल्या पडदा पडत नाहीये. एका बाजुला महाविकास आघाडीतील नेते नाराज असताना दुसरीकडे भाजप मात्र नाराजांना आपल्या छावणीत घेण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज पहिलीच कॅबिनेट बैठक पार पडली. मात्र काँग्रेसचे नेते आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या कॅबिनेट बैठकीला दांडी मारली. आपल्याला दुय्यम खाते मिळाले म्हणून वडेट्टीवार नाराज असल्याचे समजते. ते दिल्लीत दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत.

तर दुसऱ्या बाजुला भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार भाजपमध्ये येण्यास इच्छूक असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये खेचण्यास यशस्वी झाल्यानंतर आता दुसरे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देखील पक्षात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.

वडेट्टीवार यांचे भाजपमध्ये स्वागत करु – बावनकुळे

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर वडेट्टीवार यांना भूकंप व पुनर्वसन आणि ओबीसी, तसेच विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक मागास प्रवर्ग अशी खाती देण्यात आली आहेत. इतरांच्या तुलनेत आपल्याला कमी महत्त्वाचे खाते मिळाल्यामुळे वडेट्टीवार काही दिवसांपासून नाराज होते. विधानसभा निवडणुकीपुर्वी झालेल्या अधिवेशनात त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम केले होते. तसेच विदर्भातील काँग्रेसचा महत्त्वाचा नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहीले जाते. मात्र वडेट्टीवार यांच्यासारख्या महत्त्वाच्या नेत्याला दुय्यम खाते देऊन सरकारने त्यांच्यावर अन्याय केला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच वडेट्टीवार यांनी योग्य निर्णय घ्यावा आम्ही त्यांच्या सोबत असल्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितले.