विदर्भात सूर्यनारायण भयंकर तापणार! मुंबईत काय स्थिती असेल? वाचा…

महिन्याचा हा शेवटचा आठवडा चांगलाच तापणार आहे. हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे.

Maharashtra-Weather
राजस्थानमधून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात बदल झाला आहे.

फेब्रुवारीमधल्या शेवटच्या आठवड्याला सुरूवात झाली आणि एकदम उन्हाळ्यालाच सुरूवात झाली. मी मी म्हणणारी थंडी एकदम गायबच होऊन गेलीय. पण महिन्याचा हा शेवटचा आठवडा चांगलाच तापणार आहे. हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. पुढील ४८ तास महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण आणि मुंबईच्या भागात सूर्यनारायण भयंकर तापणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.

मुंबई, रायगड, रत्नागिरी या भागात तापमान ३८ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. जर फेब्रूवारी महिन्यात इतकं तापमान नोंदवलं गेलंय तर येत्या काळात उन्हाळा किती तीव्र असेल याचा अंदाज सहज लावता येऊ शकतो.

विदर्भातील उन्हाळा उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक उष्ण गणला जातो. नागपूरकरदरवर्षी दाहक उन्हाळा अनुभवतात. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच चांगले उन तापायला सुरवात झाली आहे. काही दिवसात हे तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नागपुरातील किमान तापमान १७° सेल्सिअस तर कमाल ३४°सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. परंतू विदर्भ आणखी तापणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

वायव्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम विदर्भात काही दिवसात सर्वाधिक तापमान होण्याची चिन्हं आहेत. राजस्थानमधून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात बदल झाला आहे.