मुंबई: भारतात एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. भारतातील विविध भागात एप्रिल आणि मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. कोकण वगळता इतर भागांना उन्हाचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Weather Forecast Heat wave in April May in India Meteorological department warning)
सध्या विदर्भ, कर्नाटकसह तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळे दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळीसुद्धा उन्हाच्या झळांची उष्णता जाणवत आहे. दुपारच्या वेळी तापमानात होणारी लक्षणीय वाढ रात्रीपर्यंत कायम राहत असल्यामुळे ही परिस्थिती उद्धभवली असल्याचीही माहिती हवामान विभागाने दिली आहे. याच धर्तीवर धाराशिव, नांदेड, लातूर आणि सोलापूरात उष्ण रात्रींचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या महासंचालकांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला. या अहवालामध्ये देशभरात मार्च महिना अल निनोमुळे सरासरीपेक्षा उष्ण ठरल्याची बाब समोर आली. एप्रिल आणि मे महिन्यांतही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज असल्याचा इशारा यावेळी हवामान विभागाने देत येत्या काळात मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान सरासरीपेक्षा किमान दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यताही वर्तवली.
या भागात उष्णता वाढणार
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या दरम्यान गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, बंगाल या राज्यासह आदी भागांमध्ये सर्वाधिक उष्णता असणार आहे. याबरोबरच समुद्रकिनारी असलेल्या भागालादेखील उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मे महिन्यात चार अंशांनी तापमान वाढणार?
मार्च महिन्यात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्यात एक किंवा दोन अंश सेल्सिअस तापमान कमी जास्त झाल्याची नोंद झाली. मात्र, एप्रिलमध्ये या तापमानामध्ये दोन किंवा तीन अंशाने वाढ होणार आहे. तसंच हे तापमान वाढून एप्रिल महिन्यात 42 अंश आणि मे महिन्यात तापमानामध्ये आणखी वाढ होऊन 44 अंशापर्यंत जाऊ शकते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
(हेही वाचा: Sanjay Raut : भाजपाने ईव्हीएम हटवण्याची हिंमत दाखवावी; संजय राऊतांचे आव्हान)