घरमहाराष्ट्रWeather Update : दिवाळीच्या उत्साहावर पावसाचे सावट, 'या' जिल्ह्यांमध्ये बरसणार जोरदार सरी

Weather Update : दिवाळीच्या उत्साहावर पावसाचे सावट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार जोरदार सरी

Subscribe

राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पण या उत्साहावर गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने पाणी फेरले आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. पुढील दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई : राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पण या उत्साहावर गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने पाणी फेरले आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मागील दोन दिवसांत कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील बहुतांश भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस ज्वारीसह रब्बीच्या पिकांसाठा लाभदायक असला तरी अचानक आलेल्या या पावासाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. परंतु, आता हवामान खात्याकडून अवकाळी पावसाबाबत आणखी एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. (Weather Update : Heavy rains will fall in ‘these’ districts, on the excitement of Diwali)

हेही वाचा – Gold Silver Rate : धनत्रयोदशीला सोने-चांदी दरात विक्रमी घसरण; आजचा दर किती?

- Advertisement -

मागील दोन दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग तसेच रायगडमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. पुढील दोन दिवस देखील पाऊस कायम राहणार आहे. परंतु, कोकणात पडत असलेल्या या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे आता देखील अवकाळी पावसाचा मारा आणखी काही दिवस सुरू राहिला तर यंदाही आंब्याच्या पिकांना मोठे नुकसान होणार असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

पुढील 24 तासांमध्ये हवामान खात्याकडून राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाची गरज असताना देखील तिथे मात्र वातावरण कोरडेच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईतील काही उपनगरांमध्ये देखील अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दिवाळीनिमित्ताने मुंबईतील सर्वच बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून अचानक येत असलेल्या पावसामुळे नागरिक मात्र हैराण झाले आहेत. मुंबईतील पश्चिम उपनगरे तसेच मध्य उपनगरात रात्री 8 नंतर पाऊस अचानक हजेरी लावत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून पुढील दोन दिवसही या शहरी भागांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -