‘या’ राज्यांमध्ये पावसाचा कहर, महाराष्ट्रात 14 ऑगस्टपर्यंत रेड अलर्ट, IMD चा सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. यात येत्या काही दिवसांत मध्य भारतात अशाचप्रकारे मुसळधाप पाऊस होणार असल्यचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मध्यवर्ती भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पुढील दोन दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये कमी पावसाच्या हालचाली सुरू राहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार. देशभरात मान्सून सक्रिय असून त्याची सामान्य स्थिती दक्षिणेकडे आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने थैमान पाहायला मिळणार आहे.

‘या’ राज्यांना पावसाचा सावध इशारा

भारताच्या मध्य आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD च्या माहितीनुसार, 13-16 ऑगस्ट दरम्यान पश्चिम मध्य प्रदेशात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर दुसरीकडे छत्तीसगडच्या मोठ्या भागात 13 ते 15 ऑगस्ट, विदर्भात 14 ते 16 ऑगस्ट, गुजरातमध्ये 15 ते 16 ऑगस्ट, सौराष्ट्र-कच्छमध्ये 16 ऑगस्ट, कोकण आणि गोवा आणि पूर्व मध्य प्रदेशात 13 ते 15 ऑगस्ट आणि 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती 

महाराष्ट्रातील  पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, बीड, लातूर, वाशीम, यवतमाळ, धुळे, जालना, अकोला, भंडारा, बुलढाणा, नागपूर, नंदुरबार यासह राज्यातील 28 जिल्हे अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले आहेत. यात  मुंबई उप, पालघर, ठाणे, नांदेड, अमरावती, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, सांगली, चंद्रपूर, कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांना 14 जुलैपर्यंत अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट देण्यात आला होता. तर कोकणात 13 ते 15 ऑगस्ट, विदर्भात 14 ते 16 ऑगस्ट आणि मध्य महाराष्ट्रात 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्य़ता आहे.

पूर्व आणि ईशान्य भारताला अलर्ट

याशिवाय भारताच्या पूर्व भागात, विशेषतः झारखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अरुणाचल, आसाम आणि मेघालय या उत्तर-पूर्व राज्यांमध्ये 13 आणि 14 तारखेला हवामान खात्याने (IMD) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच गंगेच्या काठावरील पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांसह ओडिशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसाचा अंगाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 13 ते 14 ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 15 ऑगस्टपासून राजस्थानच्या बहुतांश भागात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून 15 आणि 16 ऑगस्ट दरम्यान कोटा, उदयपूर, अजमेर, जोधपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ओडिसा किनारपट्टी भगात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याच्या शक्यतेमुळे 13 ते 14 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. IMD ने शनिवारी खुर्द, कटक, पुरी, बालासोर, भद्रक, ढेंकनाल, गंजम, गजपती, जाजपूर, जगतसिंगपूर, कंधमाल, कालाहंडी, केंद्रपारा आणि नयागड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. 14 ऑगस्ट रोजी कालाहंडी, बोलांगीर, नुआपाडा आणि नवरंगपूर येथे काही ठिकाणी अति मुसळधार पावसाशिवाय, संपूर्ण राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई आणि दिल्लीतही पावसाचा अंदाज

शुक्रवारी सकाळी मुंबईच्या बहुतांश भागात हलका पाऊस झाला तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊसही पडला. मात्र, मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याचे वृत्त नाही. त्याच वेळी, दिल्लीत शनिवारपासून काही दिवस शहरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.