Weather Update : फाल्गुनात वैशाख वणवा, पुढचे तीन महिनेही धोक्याचे

Weather Update | एवढंच नव्हे तर पुढचे तीन महिनेही धोक्याचा असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कारण, पुढच्या तीन महिन्यात तापमानात कमालीची वाढ होऊन आरोग्य बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

climate change, low angle view Thermometer on blue sky with sun shining in summer show increase temperature, concept global warming

Weather Update | मुंबई – गेल्या काही वर्षांपासून जागतिक तापमानवाढीमुळे (Global Warming) ऋतुचक्रात (Seasonal Cycle) वेगाने बदल होत आहेत. पावसाळा, हिवाळ्याने उशीरा एन्ट्री केली असली तरीही उन्हाळा मात्र वेळेआधीच आला आहे. सर्वाधिक थंड असणारा फेब्रुवारी महिना यंदा सर्वाधिक उष्ण महिना ठरला आहे. एवढंच नव्हे तर पुढचे तीन महिनेही धोक्याचे असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कारण, पुढच्या तीन महिन्यात तापमानात कमालीची वाढ होऊन आरोग्य बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हिवाळा जाणवत होता. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून हळूहळू तापमानात वाढ होत गेली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारताच्या विविध भागात तापमान १२ ते २० अंश सेल्सिअस होतं. तर, हेच तापमान फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ३५ ते ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचलं. त्यामुळे गेल्या १२२ वर्षांतील हा सर्वाधिक उष्ण महिना ठरला आहे. १९०१ साली फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर, यंदाही पुन्हा फेब्रुवारी महिना सर्वाधिक उष्ण महिना ठरला आहे.

यंदाच्या हिवाळ्याने लवकर एक्झिट घेतल्याने फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासूनच उकाडा जाणवू लागला. येत्या काळात देशातील काही भागात अधिक उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर-पूर्व, पूर्व आणि मध्य भारतासह उत्तर-पश्चिम भागात मार्च महिन्यात तापमान वाढणार आहे.

सातत्याने बदलत जाणाऱ्या हवामानामुळे ऋतुचक्र बिघडले आहे. पूर्वी फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडी जाणवायची. तर, होळीनंतर उकाडा वाढायचा. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तापमानात चढउतार होत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीपासूनच उकाडा जाणवायला सुरुवात होते. पूर्वी होळीनंतर तापमानात वाढ व्हायची. मात्र, यंदा होळीला अजून आठवडा शिल्लक असतानाही उकाडा वाढला आहे. दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण-पश्चिम राजस्थान, ओडिसा, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळच्या बहुतेक भागांमध्ये कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. तर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागांमध्ये तापमान 30-32 डिग्री सेल्सियस होतं. पुढच्या तीन महिन्यांत तापमानात अधिक वाढ होणार आहे. दिवसा डोक्यावर सूर्य आग ओकेल, तर रात्रीच्या कमाल तापमानातही वाढ होणार आहे.