नाशिक : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात तपमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा 10 अंशाच्या खाली घसरला आहे. धुळ्यात मंगळवारी (ता. 10 डिसेंबर) आतापर्यंतच्या सर्वात कमी तपमानाची म्हणजे 4 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. मात्र आता नाशिक जिल्ह्याचाही पारा एकदमच खाली घसरल्याने येथील सकाळच्या सत्रातील शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये मंगळवारी 9.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. किमान तपमानात साधारण 4 अंश सेल्सिअसची घट झाल्याने नाशिकमध्ये सकाळच्या सत्रातील शाळा एक तास उशिराने भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Weather Update Temperature drops in Nashik, decision to close school one hour late)
नाशिक जिल्ह्यात तपामानाच्या पाऱ्यात घट होऊ लागली आहे. ज्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. यामुळे महापालिका शिक्षण विभागाने वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शाळा एक तास उशिरा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नाशकातील महानगरपालिकेच्या शाळा या सकाळी 7 ऐवजी 8 वाजता भरविण्यात येणार आहेत. तर खासगी शाळा या सकाळी 8 ऐवजी 9 वाजता भरविण्यात येणार आहे. लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी मनपाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नाशकातील शाळा तासाभराने उशिरा भरणार आहेत. तर, वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी सुद्धा त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन सुद्धा हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा… Indapur Accident : इंदापूरमध्ये दहा ते बारा गाड्या एकमेकांना धडकल्या; नेमकं घडलं काय?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील राज्यांमध्ये 10 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये थंडीची लाट राहणार असून कोरडे थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. परिणामी उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली आहे. राज्यात येत्या दोन दिवसात किमान तपमानात कमालीची घसरण होणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात दोन ते चार अंश सेल्सिअसने तपमानात घट होण्याची शक्यता आहे. तर इतर ठिकाणीही हळूहळू तपमान घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.