प्रख्यात चित्रकार बाळ ठाकूर यांचे वृद्धापकाळाने निधन

भालचंद्र शिवराम ठाकूर असे त्यांचे पूर्ण नाव असून, 24 एप्रिल 1930 रोजी कोकणातील लांजा तालुक्यातील भांबेड येथे त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून 1948 मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. ‘जे. वॉल्टर थॉम्प्सन’, ‘अय्यर्स’, ‘उल्का’ अशा जाहिरात संस्थांत त्यांनी काही काळ नोकरी केली. 1950 नंतर ठाकूर मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे, मांडणी आणि संकल्पनांचे काम करू लागले.

रत्नागिरी : ज्येष्ठ चित्रकार भालचंद्र शिवराम ऊर्फ बाळ ठाकूर यांचे वृद्धापकाळाने निधन झालेय. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मराठी पुस्तके आणि नियतकालिकांच्या मुखपृष्ठ रेखाटनांचे सुमारे सहा दशके काम करून स्वत:ची वेगळी शैली निर्माण करण्यासाठी ज्येष्ठ चित्रकार भालचंद्र शिवराम ऊर्फ बाळ ठाकूर हे प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आहेत. कोकणातील त्यांच्या राहत्या घरीच 8 जानेवारीला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

भालचंद्र शिवराम ठाकूर असे त्यांचे पूर्ण नाव असून, 24 एप्रिल 1930 रोजी कोकणातील लांजा तालुक्यातील भांबेड येथे त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून 1948 मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. ‘जे. वॉल्टर थॉम्प्सन’, ‘अय्यर्स’, ‘उल्का’ अशा जाहिरात संस्थांत त्यांनी काही काळ नोकरी केली. 1950 नंतर ठाकूर मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे, मांडणी आणि संकल्पनांचे काम करू लागले. मराठी पुस्तकांचे मुखपृष्ठकार आणि सजावटकार म्हणून ते अधिक परिचित होते. साहित्याची उत्तम जाण असल्याने संबंधित लेखनाला अतिशय अनुरूप रेखाटने करण्यासाठी ते नावाजले गेले.

‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘ललित’ यांसारख्या मराठी साहित्य विश्वातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या नियतकालिकांसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले. प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांचे ‘आत्मकथा’, ‘प्रतिबिंब’, याशिवाय ‘गणूराया’ आणि ‘चानी’ तसेच कै. चिं. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबऱ्यांचीही मुखपृष्ठेही बाळ ठाकूर यांच्या कल्पनेतून साकारलेली आहेत.
अनेक मोठ्या साहित्यिकांच्या साहित्य कलाकृतीसाठी त्यांनी मुखपृष्ठे तयार केलेली होती. मुखपृष्ठे करताना काही काळ रंगीत पेपरवर त्यांनी स्क्रीन प्रिंटिंगचा वापर करून वेगळा अनुभव देणारी मुखपृष्ठे तयार केली होती. लक्ष्मीबाई टिळकांपासून ते बालकवी, मर्ढेकर ते बा. भ. बोरकरांपर्यंत अनेक साहित्यिकांची व्यक्तिचित्रेही त्यांनी काढलेली होती.