घरताज्या घडामोडीचोरी करण्यासाठी गेला; महिलेवर अत्याचार करून तिचा खून केला

चोरी करण्यासाठी गेला; महिलेवर अत्याचार करून तिचा खून केला

Subscribe

खरंतर त्याला करायची होती बोकडाची चोरी पण ती समोर दिसली आणि त्याची नियत फिरली. निर्मनुष्य असलेल्या काटवनाचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केले.

खरंतर त्याला करायची होती बोकडाची चोरी पण ती समोर दिसली आणि त्याची नियत फिरली. निर्मनुष्य असलेल्या काटवनाचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केले. आणि याची कोठे वाच्यता होऊ नये म्हणून तिचा खून देखील करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठ दिवसानंतर एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतले आणि खून प्रकरणाची उकल झाली. सोमनाथ बाळासाहेब गायकवाड (वय ३७, रा. टाकळी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात खानापूर शिवारात महिला दिनी आठ मार्चला एका काटवनामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनीच या महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी सुरुवातीला दाखल केलेला अकस्मात मृत्यूची नोंद नंतर कोणाच्या गुन्ह्यात वर्ग केली होती. राज्यभर महिला दिन साजरा होत असताना अकोलेमध्ये मात्र महिलेवर अत्याचार झाल्याचे समोर आल्याने जिल्हा हादरला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक रोशन पंडित आदींनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरविली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी एका आरोपीला अटक केली होती. व त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पुढे आली असतानाच पोलिसांना मात्र याप्रकरणी वेगळाच संशय होता. त्यामुळे पोलिसांनी गोपनीयरित्या या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला होता. उपअधीक्षक पंडित यांच्यासह पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे, सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील व या भागात पूर्वी काम केलेले संगमनेरच्या वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी उपनिरीक्षक दीपक ढोमणे, पोलीस हवालदार गणेश शिंदे, कैलास शिपणकर, धनंजय गडवाल, आनंद मैड, सहाय्यक फौजदार कैलास कुऱ्हाडे आदींची मदत घेत अकोले शहरात साध्या वेशात फिरत आरोपी व कुख्यात गुन्हेगार असलेला सोमनाथ गायकवाड याला ताब्यात घेतले असता या खून प्रकरणाचा उलगडा झाला.

- Advertisement -

गायकवाड हा घटनेच्या दिवशी आणखी एका सहकाऱ्यासह या परिसरात बोकड चोरण्यासाठी गेला होता. बोकड चोरण्याचा प्रयत्नात त्याला तेथे शेळ्या चारण्यासाठी आलेली महिला दिसली. या महिलेला पाहताच त्याच्यातील विकृत माणूस जागा झाल्याने त्याने तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला. आणि पीडित महिला त्याच्या अत्याचाराची शिकार झाली.
दरम्यान यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का हेदेखील पोलीस पडताळून पाहत आहेत. तसेच गायकवाड याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान आरोपी सोमनाथ गायकवाड याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -