पुणे : सरपंच संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड हा गुन्हा दाखल झाल्यावर फरार झाला होता. 31 डिसेंबरला वाल्मिक कराडने स्वत:हा पुण्यातील ‘सीआयडी’समोर आत्मसमर्पण केले. दरम्यानच्या काळात वाल्मिक कराड कुठे होता? असा प्रश्न सर्वांना पडलेला. यातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठा दावा केला आहे.
देशमुख यांची हत्या झाल्यावर वाल्मिक कराड फरार झाला होता. त्यादरम्यान कराडने राज्यातील मालमत्ता वेगवेगळ्या नावावर ट्रान्सफर केल्या, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : एका माजी नगरसेविकाच्या प्रवेशावरून आदित्य ठाकरे अन् शिंदेमध्ये जुंपली
अंबादास दानवे म्हणाले, “धनंजय मुंडे मंत्री असताना वाल्मिक कराड सगळे कामकाज सांभाळत होते. वाल्मिक कराड मुंडेंचा उजवा हात म्हणून काम करतो. मुंडे आणि कराडच्या संयुक्त मालमत्ता आहेत. देशमुख यांची हत्या झाल्यावर वाल्मिक कराड फरार झाला होता. त्यादरम्यान कराडने राज्यातील मालमत्ता वेगवेगळ्या नावावर ट्रान्सफर केल्या.”
“देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा प्रत्यक्ष संबंध दिसतो आहे. मात्र, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध आहेच. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, अशी भूमिका आम्ही घेत आहे. परंतु, सत्ताधारी पक्षाचे नेते अजूनही पुरावे मागत आहेत. मुंडे आणि वाल्मिक कराड सावलीसारखे सोबत आहेत. व्हिडिओ, सीसीटीव्ही असताना सरकार निर्लज्जपणे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा,” असं अंबादास दानवेंनी म्हटलं.
“संतोष देशमुख प्रकरणात जसा वाल्मिक कराडचा संबंध आहे; तसा धनंजय मुंडेंचा सुद्धा आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा. मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंना ठेवू नये, ही आमची भूमिका आहे,” अशी आक्रमक भूमिका अंबादास दानवेंनी व्यक्त केली.
हेही वाचा : अजितदादांची भेट घेऊन येताच क्षीरसागर यांचा मोठा दावा; म्हणाले, कृष्णा आंधळे हा…