सोलापूर : एक महिन्यांपूर्वी पक्षविरोधी कारवाई केल्याचं सांगून भाजपचे विधानपरिषदेतील आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना नोटीस बजावली होती. त्यास मोहिते-पाटील यांनी उत्तरही दिले होते. परंतु, लवकरच मोहिते-पाटील यांच्यावर भाजपकडून कारवाई केली जाणार, असं बोलले जात आहे. असे असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहिते-पाटील यांचे कौतुक केले आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपची साथ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत माजी आमदार राम सातपुतेंसह जिल्ह्यात नेत्यांनी केला होता.
याची दखल घेत भाजपकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना पक्षविरोधी कारवाई केल्याची नोटीस बजावली होती. या नोटिशीला मोहिते-पाटील यांनी उत्तरही दिले होते. परंतु, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचे संकेत भाजपकडून देण्यात येत होते.
यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1 हजार सदस्य नोंदणी केल्याबद्दल रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. एकीकडे पक्षविरोधी कारवाई केल्याची टांगली तलवार असताना बावनकुळे यांनी कौतुक केल्यानं चर्चेचा विषय बनला आहे. त्यासह बावनकुळे यांचे हेच पत्र मोहिते-पाटील यांचे समर्थक सोशल मीडियात व्हायरल करून विरोधकांची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
बावनकुळे यांनी पत्रात काय म्हटले?
मा. ना. रणजितसिंहजी मोहिते पाटील विधानपरिषद सदस्य, माळशिरस
सप्रेम नमस्कार, भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये आपण १००० सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!
भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपण जनमानसात घेऊन जात आहोत. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे, तर आपले
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही, याची सर्वांना खात्री आहे. संघटनपर्वात किमान एक हजार सदस्य भाजपा सोबत जोडून आपण संघटना बळकट केलीच आहे, शिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूतही आपण जोडून घेतलेले आहेत. आपल्या या योगदानाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!