पंढरपूरमध्ये भगिरथ भालके यांच्या पराभवास तर, दक्षिण सोलापुरातील गोंधळास काँग्रेसनं महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना दोषी ठरवलं आहे. पंढरपुरात ‘तुतारी’मुळे भगिरथ भालके यांचा पराभव झाला. दक्षिण सोलापूर मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेमुळे काँग्रेसचे नुकसान झाले, असं मत सोलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर मांडलं.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवारांची गुरुवारी मुंबईत बैठक झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, भाई जगताप यांच्यासह प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नरोटे यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) आणि शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) नेत्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. नरोटे यांनी पराभवाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर पटोले यांनी आघाडीच्या नेत्यांबद्दल अविश्वास व्यक्त करत सोलापुरात नुकसान झाल्याचं मान्य केलं.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावं म्हणून भाजप आग्रही; मोठं कारण आलं समोर
चेतन नरोटे म्हणाले, “पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल सावंत यांना 10 हजार मते मिळाली आहेत. याठिकाणी भालकेंचा 8 हजार 430 मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे नुकसान झालं आहे.”
“दक्षिण सोलापूर हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. असे असताना संजय राऊत यांनी परस्पर अमर पाटील यांना तिकीट जाहीर केले. काँग्रेसकडून दिलीप माने हे स्ट्राँग उमेदवार असतानाही त्यांना ‘एबी’ फॉर्म मिळाला नाही. काँग्रेसने धाडस करून मानेंना एबी फॉर्म देणे आवश्यक होते. त्यामुळे इथेही काँग्रेसचे नुकसान झाल्याची चिंता बैठकीत व्यक्त करण्यात आली. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे तसेच खासदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल सोलापुरात चुकीचा मेसेज जात आहे,” असे नराटेंनी बैठकीत स्पष्ट केले.
हेही वाचा : “अजितदादा ‘CM’ झाले तर मी स्वत:…”, रोहित पवारांचं विधान चर्चेत