‘काय झाडी, काय डोंगर’मुळे देशात प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटील यांचा शेकापच्या डॉ. बाबासाहेब देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभव केला. शिवसेनेकडून ( ठाकरे गट ) दीपकआबा साळुंखे, शहाजीबापू पाटील आणि बाबासाहेब देशमुख, अशी तिरंगी लढत सांगोल्यात झाली होती. त्यात शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला. पराभवानंतर पहिल्यांदाच शहाजीबापू समोर आले असून कसे पराभूत झाले, याचं कारण सांगितलं आहे.
बुधवारी सांगोल्यात कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या विचारविनिमय बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र, त्याचं रूपांतर मेळाव्यात झालं. यानंतर शहाजीबापू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंनी ‘CM’पदावरील दावा सोडल्यानंतर श्रीकांत शिंदेंची भावूक पोस्ट, म्हणाले, “बाबा…”
शहाजीबापू पाटील म्हणाले, “माझी निवडणूक संपूर्णपणे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हाताळली होती. कोणत्याही परिस्थितीत मी मुंबईत दिसलो नाही पाहिजे, हा चंग बांधला होता. त्या डावात माझा अगदी जिवलग मित्र दीपकआबा बळी पडला. आमच्या मतांच्या विभागणीमुळे माझा पराभव झाला.”
“माझा तालुका मला प्रगतीपथावर घेऊन जायचा आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या विचारांबरोबर गेल्यानंतर तालुक्याचा विकास होईल. मी एक शिवसैनिक आहे. मी मनापासून एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मी पक्ष वाढवण्यासाठी काम सुरू केलं आहे. एकनाथ शिंदे जो आदेश देतील, ते काम करेन,” असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.
“मला कोणताही शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला नाही. मात्र, एकनाथ शिंदे हे मला पक्षाची कोणतीतरी जबाबदारी देतील,” अशी अपेक्षा शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : भाजप नेतृत्त्व धक्कातंत्राच्या तयारीत! शहा अन् तावडेंमध्ये बैठक, ‘CM’ फडणवीसच की…