पुणे : उदय सामंत यांनी विश्व मराठी संमेलनास मुंबईतून पुण्यात आणले. याबद्दल उदय सामंत यांचे आभार मानतो. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी आहे. माझ्यासारख्या नागपुरी माणसाला पुण्याची मराठी प्रमाण मराठी आहे. प्रमाण मराठीच्या माहेरघरी विश्व मराठी संमेलन होत आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पुण्यात होत असलेल्या ‘विश्व मराठी संमेलन 2025’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे बोलत होते.
हेही वाचा : ‘मुंडेंची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही’, नामदेव शास्त्रींच्या विधानावर जरांगे-पाटील म्हणाले, “असे महंत…”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे पहिले संमेलन आहे. त्यासाठी मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ही देखील आनंदाची गोष्ट आहे.”
“उदय सामंत सांगत होते, ‘काही लोकांनी वाद निर्माण केला; कुणी प्रश्न उपस्थित केले.’ उदयजी तुम्हाला मी सांगू इच्छितो, साहित्य, नाट्य, विश्व मराठी संमेलन असो; वाद निर्माण झाला नाही, तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही,” असं फडणवीस यांनी म्हटल्यावर एकच हशा पिकला.
“वाद निर्माण करणे हा आपला स्थायी भाव आहे. वाद, विवाद आणि प्रतिवाद झालाच पाहिजे. तुम्ही फार काळजी करू नका. अशाप्रकारचे संमेलन आपण करत राहायचे. कुणी नावे ठेवते, कुणी चांगले म्हणते. त्यातून चांगले मंथन होते आणि शक्ती, बुद्धी आपल्याला मिळत असते,” असं फडणवीस यांनी सांगितलं.
“जगाच्या पाठीवर एकही असा देश नाही, तिथे मराठी माणूस पोहोचला नाही. आम्ही जगात कुठेही गेलो, तरी मराठी माणूस आमच्या स्वागताला तिथे असतो. जपान, अमेरिका गेलो, तिथे मराठी माणूस स्वागताला होता. दावोसला गेल्यावरही मराठी माणसे आली होती. एका चिमुरड्याने, ‘लाभले आम्हाला भाग्य बोलतो मराठी,’ हे इतक्या सुंदरपणे म्हणून दाखवले. मला एवढा अभिमान वाटला की, आपला मराठी माणूस इतके वर्षे तिकडे गेला, तरी त्याच्यापासून माय मराठी दुरावली नाही. माय मराठी त्याच्या मनात आहे. ती माय मराठी पुढील पिढीला पोहोचवण्याचे काम तो करत आहे. त्यावेळी त्या चिमुरड्याने, ‘मी पुन्हा येईन सुद्धा’ म्हटले. हे ‘मी पुन्हा येईन’ माझा पिच्छा सोडत नाही, अजितदादा… कुठेही गेले की, ‘मी पुन्हा येईन..’ परंतु, अलीकडील काळात चांगले बोलतात. मागील काळात उपहासाने म्हणायचे. शेवटी एखादा शब्द आपल्याला चिकटतो. काळ आणि वेळानुसार त्याचे अर्थ बदलतात. जेव्हा, जेव्हा विश्व मराठी संमेलन होणार, तेव्हा, ‘मी पुन्हा येईन,’ ‘मी पुन्हा येईन,'” असं फडणवीस यांनी म्हटलं.
हेही वाचा : बैठकीत गरमागरमी! ‘लई मागचे बोलू नका, तुम्हाला….’, अजितदादांनी धस यांना सुनावले