सांगली : मस्साजोगचे सरपचं संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवरून विरोधकांकडून एक महिना झाले धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कुठलेही पुरावे समोर आल्याशिवाय राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. यातच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
याप्रकरणात तथ्य आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटले, तर ते धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : ‘गरिबाला गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले’, झिरवाळांच्या विधानावर अजितदादा नाराज; म्हणाले, अशा पद्धतीचे…
चंद्रकांत पाटील म्हणाले, “संतोष देशमुख हत्याप्रकरणात चौकशी सुरू आहे. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास समर्थ आहेत. त्यांना जर वाटले की याप्रकरणात काही तथ्य आहे, तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील.”
“देशमुख हत्याप्रकरणात अद्याप पोलीस चौकशी सुरू आहे. एसआयटी नेमण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यात आली आहे. वाल्मिक कराडसह आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कराडची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. कराडला देखील 302 च्या गुन्ह्यात घेतील,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजी? याबद्दल प्रश्न विचारल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “जिवंत माणसांना एखादी आवडते आणि नावडते. त्यामुळे जिंवत माणसांत रूसवे, फुगवे असतात कुटुंब प्रमुख रूसवे, फुगवे संपवतात. आमचे कुटुंब प्रमुख दाओसला गेले होते. आता ते परतले आहेत. ते रूसवे-फुगवे काढतील.”
हेही वाचा : गुलाबराव पाटील यांचा मोठा खुलासा; म्हणाले, एकनाथ शिंदेंनी…