पुणे : शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. आता महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी संघटनात्मक पातळीवर चाचपणी करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत नाराजीनाट्य घडल्याचे पाहायला मिळाले आहे. एकीकडे पुण्यात पक्षाला गळती लागली असताना हे नाराजीनाट्य पक्षाला परवडणारे आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
खासदार संजय राऊत यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक बोलावली होती. या बैठकीला संपर्कप्रमुख सचिन अहिर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नेत्या सुषमा अंधारे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक वसंत मोरे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : पुण्यात ‘NCP’च्या नेत्यानं एका व्यक्तीला उचलून आपटले, अजितदादा संतापले; थेट फोन केला, पण…
ही बैठक चालू झाल्यावर पाच मिनिटांत माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे बैठकीतून बाहेर पडले. बैठकीत चंद्रकांत मोकाटे यांच्याजवळच्या खुर्चीवर पृथ्वीराज सुतार हे बसले होते. परंतु, कोथरूड विधानसभा निवडणुकीतील अंतर्गत वादामुळे मोकाटे यांचा सुतार यांच्यावर आक्षेप होता. त्यामुळे मोकाटे हे बैठक सुरू झाल्यानंतर लगेच बाहेर आले.
चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत मोकाटे विरुद्ध चंद्रकांतदादा पाटील, अशी लढत झाली होती. या निवडणुकीत चंद्रकांत मोकाटे यांचा 1 लाख 12 हजार मतांनी पराभव झाला होता.
बैठकीतून बाहेर पडताच तुम्ही नाराज आहात का? कारण तुम्ही बैठकीतून पाच मिनिटांत बाहेर आला? बैठकीत काय झाले का? असे प्रश्न चंद्रकांत मोकाटे यांना विचारण्यात आले. त्यावर, “बैठकीत काय झाले नाही. सुषमा अंधारे आल्या, त्यामुळे त्यांना खुर्ची दिली. बसायला जागा नसल्याने मी बाहेर आलो. सुषमा अंधारेंना कार्यकर्त्यांमध्ये कसे बसवणार? त्या नेत्या आहेत आमच्या…”, अशी प्रतिक्रिया मोकाटे यांनी दिली.
त्यामुळे मोकाटे यांची नाराजी पृथ्वीराज सुतार की सुषमा अंधारेंबाबत होती? हे कळाले नाही. परंतु, बैठकीनंतर खासदार संजय राऊत म्हणाले, “पुण्याच्या शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे बैठक सोडून गेले नाहीत. ते सुरूवातीपासून बैठकीला उपस्थित होते.”
अलीकडेच ठाकरेंच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत नाराजीनाट्य घडत असल्यानं उद्धव ठाकरे याकडे लक्ष देणार आहात की नाहीत, असाही प्रश्न सर्वांना पडत आहे.
हेही वाचा : …तर फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील; चंद्रकांतदादांनी स्पष्टच बोलून टाकलं