पंढरपूर : मी बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक आहे. लंगोट लावून तयार आहे. मोहोळ नगरपरिषदेसह पंढरपूरची नगरपरिषद ताब्यात घेऊ. मी तुतारीवाला नुसता नावाला आहे. राज्यात सत्ता आपली आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी केले आहे. यामाध्यमातून राजू खरे यांनी पक्ष बदलाचे संकेत दिल्याचं बोलले जात आहे.
पंढरपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, भैरवनाथ साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन अनिल सावंत, शिवसेना ( ठाकरे गट ), राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खरे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांना आव्हान दिलं आहे.
हेही वाचा : पुण्यात राऊतांसमोर माजी आमदार तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले, नाराजीचं कारण अंधारे की…
आमदार खरे म्हणाले, “मोहोळ विधानसभेच्या निवडणुकीत लढत असताना परिचारक यांनी मला पाडण्यासाठी पंढरपुरातील सतरा गावातून जंग जंग पछाडत होते. त्याचा बदला आता नगरपरिषदेच्या माध्यमातून घेण्याची वेळ आलेली आहे. मोहोळमध्ये राजन पाटील यांची सत्ता घालवण्यासाठी विजयराज डोंगरे, उमेश पाटील आदी नेते बरोबर होते. पंढरपूर तर माझी जन्मभूमी आहे. राजकारणाचं बाळकडू पंढरपुरातच घेतलेलं आहे. त्यामुळे या सर्वांच्या मदतीने मोहोळ आणि पंढरपूरची नगरपरिषद ताकदीनिशी लढणार आहे.”
दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपही सोबत
“मी सच्चा शिवसैनिक आहे. मोहोळची जागा राजन पाटील विरुद्ध शिवसेना अशी होती. नेहमी थोडक्या मतांनी सेनेची ही जागा जायची. यंदा जिंकण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र आणल्या. भीमशक्ती एकत्र आली. छुप्या पद्धतीने भाजपही सोबत होती,” असेही आमदार खरे यांनी सांगितलं.
आधी वक्तव्य नंतर आमदार खरेंचा घुमजाव…
“माझे पूर्ण भाषण ऐकले तर कळेल. माझा 1990 ते 2024 असा 34 वर्ष राजकीय प्रवास शिवसेनेत शिवसैनिक म्हणून झाला आहे. यंदा मोहोळ मतदारसंघात मशाल व धनुष्यबाण ही नाही. यामुळे शिवसैनिक अस्वस्थ होते, परिणामी दोन्ही बाजूच्या शिवसैनिकांनी काहीही करून ही जागा आपल्याला काढायची असे निर्णय घेतला. मला महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांचेही मला आशीर्वाद होता. परंतु मी तुतारीचाच आहे,” असं म्हणत आमदार खरे यांनी घुमजाव केला आहे.
हेही वाचा : खळबळजनक! मुलीवर अत्याचार करून मारून टाक; विद्यार्थ्यानं दिली 100 रूपयांची सुपारी