कोल्हापुरातील दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात काँग्रेसला भाजपनं पराभवाची धूळ चारली. हा पराभव कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागली आहे. दक्षिण आणि उत्तर कोल्हापूर मतदारसंघात ठिकाठिकाणी राजेश क्षीरसागर आणि अमल महाडिक यांच्या विजयाचे बॅनर्स लावले आहे. याला आता सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावून प्रत्युत्तर दिलं आहे.
दक्षिण कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसचे ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे अमल महाडिक, अशी लढत झाली होती. यात ऋतुराज पाटील यांचा पराभव झाला. तर, उत्तर कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांच्यात फाइट झाली. या लढाईत क्षीरसागर यांनी लाटकर यांना पराभूत केलं.
हेही वाचा : भाजपच्या बड्या नेत्याचाही ‘ईव्हीएम’वर भरोसा नाही का? पडताळणीसाठी दाखल केला अर्ज
सतेज पाटील यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. यानंतर महाडिक आणि क्षीरसागर यांच्या विजयाचे बॅनर्स लागले आहेत. एकप्रकारे त्यातून सतेज पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न महाडिक आणि क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी केला. पण, शांत बसतील ते सतेज पाटील यांचे कार्यकर्ते कसले.
सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कसबा-बावड्यासह साऱ्या कोल्हापूर शहरात बॅनर्स लावत पराभवातून खचून जाणार नसल्याचा संदेश दिला आहे.
‘बाकीच्यांनी आमची काळजी करू नये, आमचं निस्तारायला आमचा साहेब घट्ट आहे’, ‘गुलालाचाच विषय हाय नव्हं, थोडे दिवस थांबा लवकरच घरपोच होईल’, ‘हरलो तरी मैदान सोडलेले नाही… वेळ कोणती पण असुदेत, कालपण-आजपण आणि उद्यापण, सदैव तुमच्यासोबत… पडत्या काळात साथ सोडणारी आमची औलाद नाही…कायम एकनिष्ठ,’ ‘तू चाल रे पुढे, भीती कशाची,’ अशा प्रकारचे आव्हानात्मक बॅनर्स लावून महापालिका, जिल्हापरिषद निवडणुकीत परतफेड करण्याचा इशाराच दिला आहे.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावं म्हणून भाजप आग्रही; मोठं कारण आलं समोर