सोलापूर : महसूलमंत्री असताना सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदारांना मदत केल्याची कबुली राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टेंभुर्णी येथील कार्यक्रमात दिली होती. त्यामुळे विखे-पाटील यांची चौकशी करून त्यांना मंत्रिपदावरून दूर करावे, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे केल्याची माहिती शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेते शरद कोळी यांनी दिली. याचिकेसोबत कोळी यांनी विखे-पाटील यांचे ठेकेदारांसंदर्भातील व्हिडिओही दिले आहेत. त्यामुळे विखे-पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात.
शरद कोळी म्हणाले, “टेंभूर्णी आणि परिसरातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशी वाळू उपसा होता. हे लोक आमचेच आहेत, त्यांच्यावर कारवाई करून नका, अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्याची कबुली राधाकृष्ण विखे-पाटली यांनी टेंभुर्णी येथील कार्यक्रमात जाहीरपणे दिली आहे. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला.”
हेही वाचा : ‘मी तुतारीवाला नुसता नावाला, खरा तर मी…’, शरद पवारांच्या आमदाराकडून पक्ष बदलाचे संकेत?
“त्यानंतर महसूलच्या अधिकाऱ्यांनी टेंभुर्णी भागातील ठेकेदारांवर कारवाई सुरू केली. ही कारवाई करताना प्रांताधिकाऱ्यांवर हल्ला झाला. याचा अर्थ आजपर्यंत कारवाया होत नव्हत्या. कारवाया सुरू झाल्याने हल्ले सुरू झाले आहेत. विखे-पाटील यांच्या आदेशामुळेच आजवर कारवाया होत नसाव्यात. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,” अशी मागणी न्यायालयाकडे केल्याची माहिती शरद कोळी यांनी दिली.
“भाजपवाले गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जोपासतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याप्रकरणात अधिकाऱ्यांचा सहभाग होता का? याची चौकशी करावी. दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे,” अशी मागणीही याचिकेद्वारे कोळी यांनी केली आहे.
विखे-पाटील काय म्हणाले होते?
टेंभुर्णीतील एका कार्यक्रमात बोलताना विखे-पाटलांनी म्हटलं, ‘येथे स्टेजवर कुमार आशीर्वाद असले तरी शेवटी त्यांना मागे मी म्हटलं होते, वाळूंच्या गाड्यांकडे दुर्लक्ष करा. गाड्या चालू राहू द्या. काय फरक पडत नाही. आपले लोक आहेत सगळे…’ मंत्री विखे-पाटील अशी कबुली दिल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्मितहास्य केले होते.
हेही वाचा : पत्नीचा मृत्यू झाला, मी अर्धा तास…; चेंगराचेंगरीत अडकलेल्या व्यक्तीनं सांगितली आपबीती