पुणे : मराठी भाषिकांना मारहाण आणि मराठी बोलणाऱ्यांना दमदाटी करणे, असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. अशांवर कठोर कारवाई व्हावी. यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली.
पुण्यात होत असलेल्या ‘विश्व मराठी संमेलन 2025’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले. तेव्हा उदय सामंत बोलत होते.
हेही वाचा : दावोसमधील ‘त्या’ चिमुरड्याचा किस्सा सांगत फडणवीस म्हणाले, ‘मी पुन्हा येईन…’
उदय सामंत म्हणाले, “आपण प्रत्येक भाषेचा आदर करतो. राज्यात प्रत्येक जाती धर्माची माणसे राहतात. तो आपल्याकडे येत असताना त्याची भाषाही आणतो. या भाषेचा आदर आपण नेहमी केला आहे. पाहुणचार आपण केलेला आहे. आपण त्यांच्या भाषेचा अनादर केला नाही. भविष्यात कुठलाही महाराष्ट्रातील युवक त्यांच्या भाषेचा अनादर करणार नाही.”
“काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषेला आणि मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्याविरोधात कडक कायदा झाला पाहिजे. कठोर शासन केले पाहिजे, ही महाराष्ट्रातील मराठी युवांची मागणी आहे,” असं उदय सामंत यांनी सांगितलं.
“मराठी भाषेचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी, अस्मिता जपण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काहीतरी कार्यवाही करावी. काही लोक मराठी भाषा मंत्रालयाकडून पैसे घेतात. मराठी माणसांच्या उद्धारासाठी हे पैसे वापरले जातात. मराठी भाषेचे संवर्धन, जतन आणि प्रचार करण्यासाठी आपण सगळे एकत्र येणे गरजेचे आहे. मराठी अपमान होणार नाही, याची खबरदारी शासन म्हणून आम्ही घेऊ,” असं सामंत यांनी म्हटले.
हेही वाचा : ‘मुंडेंची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही’, नामदेव शास्त्रींच्या विधानावर जरांगे-पाटील म्हणाले….