शिवसेना-वंचितची युती, निवडणुकांमध्ये जागावाटप कसे असेल? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

Shivsena-VBA alliance | निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. हिंमत असेल तर निवडणुका घ्या. युती नव्हती तेव्हापासूनचं हे आव्हान आहे. लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

shivsena vba alliance

Shivsena-VBA alliance | मुंबई – वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना हा घटकपक्ष आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये जागावाटपाचं गणित कसं असेल असा प्रश्न उपस्थित केला जातोय. याबाबत उद्धव ठाकरेंना विचारले असता त्यांनी या जागावाटपचा फॉर्म्युला सांगितला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा तीन घटकपक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. हे तिन्ही मूळ पक्ष असले तरीही या प्रत्येक पक्षाचे स्वतंत्र अनेक मित्रपक्षही आहेत, जे महाविकास आघाडीचे घटकपक्ष नाहीत. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी हा पक्षही फक्त शिवसेनेचा मित्रपक्ष राहणार आहे. तो महाविकास आघाडीचा भाग नसेल. परंतु, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीतही घटकपक्ष म्हणून वाटचाल करायला कोणाची हरकत नसेल, असं उद्धव ठाकरेंनी आज स्पष्ट केलं. तसंच, त्या त्या पक्षाने आपआपल्या मित्रपक्षाचे हित सांभाळायचे, असं ठरले असल्याचंही ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा ठाकरे-आंबेडकर युती : कसा असे फॉर्म्युला? उद्धव ठाकरे म्हणाले…

दरम्यान, येत्या काळात महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर अनेक लहान-मोठ्या पक्षांनी ठाकरे गटाला पाठिंबा दर्शवला. तर, वंचित बहुजन आघाडीने आता शिवसेनेसोबत युती केली आहे. येत्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्पष्टपणे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागावाटप कसे असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, आता शिवसेनेसोबत वंचितची युती जाहीर झाल्याने महाविकास आघाडीतील जागा वाटपात वंचितलाही स्थान मिळणार की शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी काही जागा वंचितला मिळणार याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही.

हेही वाचा – मोठी बातमी! ठाकरे गट आणि वंचितची युती; पक्षप्रमुखांकडून अधिकृत घोषणा

परंतु, राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितल्यानुसार, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या जागावाटपात स्थान मिळणार नाही. परंतु, ते शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागेवर लढू शकतील. त्यामुळे, महाविकास आघाडीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही मुख्य घटकपक्षांसाठी जागावाटप होईल. त्यानंतर आपल्या वाट्याला आलेल्या जागांपैकी घटकपक्ष त्यांच्या मित्रपक्षांना जागा देऊ शकतील, असा कयास राजकीय तज्ज्ञांकडून लावला जातोय.

निवडणुका लागल्यावर कोणाला कोणती जागा द्यायची यावर चर्चा होईल. मग त्यापैकी कोणत्या मित्र पक्षाला जागा द्यायची हे ठरवलं जाईल. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातही आम्ही तेच केलं, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – युती सेनेसोबत, मविआचं नंतर बघू; प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांकडूनही केली अपेक्षा