प्रताप सरनाईक यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप कोणते? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचे कारण काय?

गच्छंती अटळ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्र

शिवेसना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यामागे ईडीचा ससेमीरा लागल्यानंतर काही महिने ते गायब झाले होते. रविवारी भाजपकडून ठाण्यात सरनाईक गायब असल्यामुळे आंदोलन करण्यात आल परंतु त्याच वेळी एका कार्यक्रमात रुग्णवाहीकांचे लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमाला प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती लावली. तर सोमवारी प्रताप सरनाईक यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र सरनाईक यांनी १० जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले असून मोठं खुलासे आणि दावे सरनाईकांनी पत्रातून केले आहेत. सरनाईक यांच्यावर गंभीर भ्रष्टाराचे आरोप करण्यात आले आहेत.

७८ एकर जमीन घोटाळा

आमदार प्रताप सरनाईक आणि मोहीत अग्रवाल यांनी एन एस ई एल, कंपनीसाठी दोनशे कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्यातील १०० कोटी रुपये कल्याण तालुक्यातील गुरुवली येथील ७८ एकर जागा खरेदीत गुंतवले. याबाबत कंपनीच्या नावाने कोटी रुपये फसवणूक केली आल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर याबाबत खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. ईडीने संपूर्ण प्रकाराची चौकशी केली आणि अखेर १०० कोटी रुपये भरण्यासाठी सांगितले होते. ते न भरल्याने गुरुवली येथील ११२ सातबारा असलेली जमीन म्हणजेच एकुण ७४.२७ एकर जमिनीवर ईडीने कारवाई करत ताबा घेतला आहे. मंडल अधिकारी यांनी जागेवर जाऊन नोटीस लावली आहे.

मनी लॉंडरिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ई़डीने धाड टाकली होती. एनएसईएल म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स एक्सचेंज लिमिटेड प्रकरणात धाड टाकण्यात आली होती. एनएसईएल म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स एक्सचेंज लिमिटेडचे प्रकरण आहे, ज्यात यावर्षी एप्रिल महिन्यात बिल्डर योगेश देशमुखला अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सुमारे ५५०० कोटींच्या सावकारीशी संबंधित आहे, या प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांना पैसे हवे होते.

सरनाईक राजकारणाबरोबर ते व्यावसायिक

आमदार प्रताप सरनाईक हे राजकारणात सक्रिय तर आहेत, शिवाय बांधकाम व्यावसायिक म्हणूनही त्यांचे नाव सर्वांना आजही सुपरिचित आहे. याशिवाय त्यांनी मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही नशीब आजमावले असून तेथे त्यांनी जम बसविण्याचा प्रयत्न केला आहे. तर, त्यांचे ठाण्यातील वर्तकनगर, घोडबंदर या भागात हॉटेल्स आहेत. त्याचबरोबर ते आता हॉस्पिटल्स व्यावसायासह शिक्षण क्षेत्रात उतरले आहेत.

१७५ कोटींचा टॉप्स ग्रुप घोटाळा

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे कंपनीचे प्रवर्तक राहुल नंदा आणि इतरांविरुद्ध टॉप्स ग्रुपच्या माजी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एफआयआरच्या आधारे ईडीने एक अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल नोंदवला आहे. २८ ऑक्टोबरला दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार टॉप्स ग्रुपने मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाला (MMRDA)ला १७५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. एमएमआरडीएच्या जागेवर सुरक्षा रक्षकांना नेमुकीचे कंत्राट टॉप्स ग्रुपला मिळालं आहे. हा करार करण्यामध्ये राहुल नंदाचे जुने मित्र प्रताप सरनाईक यांनी मदत केली असल्याचा आरोप आहे. तसेच अशी शंका आहे की, सरनाईक या टॉप्स ग्रुपच्या माध्यमातून परदेशात पैसे पाठवत आहेत. युकेमध्ये केलेली गुंतवणूक आणि मॉरिशसमधील ट्रस्टमुळे नंदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. परंतु नंदा यांनी आरोपांचे खंडन केलं आहे. टॉप्स ग्रुपने १७५ कोटींचे कंत्राट मिळवण्यासाठी MMRDA ला ७ कोटींची लाच दिली होती यामध्ये सरनाईकही सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गच्छंती अटळ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई सुरु आहे. ईडीने तिसऱ्यांदा सरनाईक यांच्याविरोधात कारवाई केली आहे. पुर्वी सरनाईकांच्या जमीनी ईडीने ताब्यात घेतल्या आहेत. ईडीकडून न्यायालयात ईडीची कोठडीत सरनाईक यांना द्यावे अशी मागणी केली आहे. टॉप्स ग्रुपच्या घोटाळ्यात ईडीने सरनाईक यांच्या मालमत्तेवर छापा टाकल्यानंतर सरनाईक ४ ते ५ महिने गायब होते. सरनाईक यांना तुरुंगाचे दरवाजे दिसू लागल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. तसेच सरनाईक आणि इतर शिवसेना नेत्यांविरोधात सुरु असलेल्या तपास यंत्रणांचे ससेमिरे थोपवायचे असतील तर भाजपशी हातमिळवणी केली पाहिजे याची प्रचिती आली असावी म्हणूनच प्रताप सरनाईक यांनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजपशी जुळवून घ्यायची विनंती केली असावी तसेच सरनाईक यांनी म्हटलं आहे की, भाजपसोबत हातमिळवणी केल्यास नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही जास्त त्रास होणार नाही. यामुळे भाजपसोबत युती करावी अशी मागणी सरनाईक यांनी पत्राद्वारे केली आहे.