नवी मुंबई – नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांवर सातत्याने हल्ले होत असताना आता एका महिला बांधकाम व्यावसायिकावर हल्ला झाला आहे. पनवेल परिसरात रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या स्नेहल पाटील यांच्यावर काल, मंगळवारी (२८ मार्च) रात्री उशिरा गोळीबार झाला. या घटनेत त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर नेरुळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्नेहल पाटील पनवेलवरून उरणा स्वतःच्या गाडीने जात होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मावस भाऊ होता. गाडी गव्हाण फाटा येथे पोहोचल्यावर त्यांच्या गाडीवर अज्ञात इसमाने गोळीबार केला. या गोळीबारात स्नेहल पाटील यांच्या पायाला गोळी लागली. त्यामुळे त्यांना नजिकच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिका वादातून हा हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा – ‘खून का बदला खून’; नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येचा उलगडा; आरोपी अटकेत
मंजेरी हत्येचा उलगडा
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत गुन्हेगारी वाढत आहे. बांधकाम व्यावसायिक अनेकांच्या रडारवर आहेत. १५ मार्च रोजी येथील इम्पिरिया गृहसमुहाचे भागीदार सवजीभाई गोकर मंजेरी यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा छडा लावण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही व गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांच्या आधारे पोलिसांनी मंजेरी यांच्या हत्येतील एका प्रमुख आरोपीला गुजरात तर तिघांना बिहार येथून अटक केली आहे. अंतर्गत वादातून मंजेरी यांची हत्या झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
मंजेरी यांच्या हत्येचा कट रचणारा आरोपी मेहेक जयरामभाई नारीया (वय २८) रा.राजकोट गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. तर मंजेरी यांच्यावर गोळया झाडणारे बिहारचे रहिवासी कौशल कुमार विजेदर यादव (वय १८), गौरवकुमार विकास यादव (वय २४), सोनूकुमार विजेदर यादव (वय २३) यांना पोलिसांनी अटक केली आहे.