घर महाराष्ट्र जालन्याच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उल्लेख केलेले 'गोवारी हत्याकांड' आहे तरी काय?

जालन्याच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उल्लेख केलेले ‘गोवारी हत्याकांड’ आहे तरी काय?

Subscribe

गोवारी हत्याकांड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री असताना घडलेले होते. ज्यावेळी तब्बल 114 गोवारी समाजातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याच हत्याकांडाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

मुंबई : राज्यात मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला मागील आठवड्यात शुक्रवारी (ता. 01 सप्टेंबर) जालन्यात वेगळे वळण लागले. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. त्याचवेळी 1 सप्टेंबरला पोलिसांकडून या आंदोलनाला चिरडण्यासाठी अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. त्यावेळी आंदोलकांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आल्याचे देखील आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून घटनेच्या 3 दिवसानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवारी हत्याकांडाबाबतचा उल्लेख केला. गोवारी हत्याकांड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री असताना घडलेले होते. ज्यावेळी तब्बल 114 गोवारी समाजातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याच हत्याकांडाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला लगावला. (What is ‘Gowari Massacre’ mentioned by Deputy CM Devendra Fadnavis)

हेही वाचा – मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी वटहुकूम का काढला नाही? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

- Advertisement -

01 सप्टेंबरला जालन्यामध्ये मराठा समाजावर लाठीहल्ला करण्यात आला. यामध्ये अंतरवली सराटी गावात आंदोलनाला बसलेले मराठा समाजातील अनेक लोक जखमी झालेले आहेत. ज्यानंतर आता या घटनेबाबतचे राजकारण देखील करण्यात येत आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु विरोधकांकडून याबाबत राजकारण करण्यात येऊ नये, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. परंतु तरीदेखील विरोधक या घटनेचे राजकारण करताना पाहायला मिळत आहेत.

ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आंदोलन स्थळी दाखल झाले होते. त्याआधी त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी अंतरवली सराटी गावात मराठा आंदोलनाचे समन्वयक मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. परंतु या मुद्द्यावरूनच आता देवेंद्र फडणवीस यांनी गोवारी हत्याकांडावरून शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे. 1994 साली ज्यावेळी गोवारी हत्याकांड घडले, त्यावेळेस त्या समाजावर लाठीहल्ला करण्याचे आदेश कोणी दिले होते, याबाबत सांगण्यात यावे, असा प्रश्न त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता उपस्थित केला आहे.

काय आहे गोवारी हत्याकांड?

- Advertisement -

ज्याप्रमाणे आज मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. त्याचप्रमाणे 1994 मध्ये आदिवासी जमातींपैकी एक असलेल्या गोवारी समाजाने आपल्या न्यायासाठी आंदोलन पुकारले होते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते, शरद पवार. 23 नोव्हेंबर 1994 या दिवशी गोवारी समाजाचे शांततेने आंदोलन सुरू असताना पोलिसांकडून त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला. याचवेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 114 गोवारींना आपला जीव गमवावा लागला.

1994 मध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात राज्याचा कारभार सुरू होता. त्यावेळी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी म्हणजेच 23 नोव्हेंबर 1994 या दिवशी गोवारी समाज हक्क मागण्यासाठी नागपुरात आला. सायंकाळचे सहा वाजून गेले होते, मात्र गोवारींच्या मोर्चाची दखल कोणत्याही नेत्याकडून किंवा मंत्र्याकडून घेण्यात आलेली नव्हती. पण मुख्यमंत्री येतील, गोवारींचे ऐकतील, अशी आशा या गोवारी मोर्चेकऱ्यांना होती. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांची वाट पाहताना मोर्चेकऱ्यांचा जीव तहानेने व्याकूळ झाला होता. काहींनी फाटलेल्या लुगड्याच्या कापडात बांधून आणलेली कांद्या मिरच्यांची शिदोरी सोडली आणि भाकरीचा घास घेणार तोच बंदुकीच्या गोळीचा आवाज झाला, असे सांगण्यात येते. या आंदोलकांवर त्यावेळी पोलिसांकडून अमानुषपणे लाठीहल्ला देखील करण्यात आला.

या घटनेमध्ये 71 महिला, 17 पुरुष आणि 23 लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला. नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज किंवा मेयोमध्ये त्यादिवशी उशिरापर्यंत मृतांची ओळख पटत नव्हती. आधी वाटले 5-6 जणांचाच या घटनेत मृत्यू झाला आहे. पण रात्री बाराच्या सुमारास या घटनेचे वेदनादायी वास्तव समोर येण्यास सुरुवात झाली आणि मग हा मृतांचा आकडा शंभराच्या पलीकडे गेला. 500 पेक्षा जास्त मोर्चेकरी या घटनेत गंभीर जखमी झाले होते. ज्यानंतर या घटनेचे राजकीय पडसाद उमटले होते. परंतु इतकी मोठी घटना घडून सुद्धा त्यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नव्हता आणि हेच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना पुन्हा आठवून दिले आहे.

- Advertisment -