घरमहाराष्ट्रमुंबईचे अध्यक्षपद रिकामे ठेवण्यात जयंत पाटील यांचा स्वार्थ काय?

मुंबईचे अध्यक्षपद रिकामे ठेवण्यात जयंत पाटील यांचा स्वार्थ काय?

Subscribe

सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदाचा आणि प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा न देताच शिवसेनेत प्रवेश केला. वास्तविक आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तातडीने नव्या मुंबई शहर प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती होणे आवश्यक होते. मात्र, सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाला चार दिवस उलटल्यानंतरही मुंबईच्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यासाठी जयंत पाटील यांना वेळच मिळत नसल्याचे दिसत आहे! त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्षाची नियुक्ती लवकर न करण्यामागे जयंत पाटील यांचा स्वार्थ काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: नवाब मलिक यांना फोन करून ’तुम्ही मुंबईची जबाबदारी सांभाळा’ असे सांगितले. त्याची माहितीही मलिक यांनी जयंत पाटलांना दिली. मात्र तरीदेखील जयंत पाटलांनी पवारांनाच थोडे थांबायला सांगून ’आपण स्वत: त्यात लक्ष घालून लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊ’ असे आश्वासन दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ’आपलं महानगर’ला दिली. एकीकडे हे घडत असताना दुसरीकडे नवाब मलिक मुंबईचे अध्यक्ष होऊ नयेत यासाठी राष्ट्रवादीतील एक गट मुंबईतील प्रत्येक तालुकाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांना फोन करून ही निवड कशी लांबवता येईल याची काळजी घेत असल्याचे देखील समजते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षावरून आता पक्षांतर्गत राजकारण रंग घेऊ लागल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांना जयंत पाटलांचाच विरोध!
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून मुंबईत मागील २० वर्षांत १२ वर्षांहून अधिक काळ सचिन अहिर मुंबई अध्यक्ष होते. तर तब्बल १५ वर्षे जयंत पाटील हे मुंबईचे पालकमंत्री होते. काही वर्षे मुंबईची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याही खांद्यावर होती. या तिन्ही नेत्यांनी मुंबईत पक्ष वाढणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आणि त्याचेच फलित म्हणून की काय, २० वर्षांनंतरदेखील मुंबईसाठी पक्षातून कार्यक्षम अध्यक्ष मिळू शकलेला नाही. सचिन अहिर यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या तिसर्‍या टर्मवेळीच कार्याध्यधपदी असणार्‍या नवाब मलिक यांना अध्यक्षपद देण्याचे खुद्द शरद पवारांनीच मान्य केले होते. मात्र, विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच मलिक यांना पद मिळू नये असा चंगच बांधला असल्याचे राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने ’आपलं महानगर’ला सांगितले. आता राष्ट्रवादीच्या गोटातूनच मुंबईच्या अध्यक्षपदासाठी माजी खासदार संजय पाटील, विधानपरिषद सदस्य किरण पावसकर, विधानपरिषद सदस्य विद्या चव्हाण आणि खासदार माजिद मेमन यांची नावे पुढे केली जात आहेत. पण विशेष म्हणजे यापैकी संजय पाटील आणि किरण पावसकर यांनी आपण इच्छुक नसल्याचे वारंवार वरीष्ठ नेत्यांना सांगितल्याचे समजते.

नवाब मलिकही अध्यक्षपदासाठी इच्छुक नाहीत?
येत्या महिन्याभरात विधानसभेची आचारसंहिता लागू होईल. प्रत्यक्ष निवडणूक १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजपला अंगावर घेत प्रचाराची राळ उडवण्याबरोबरच पक्ष एकसंध बांधून ठेवण्यासाठी फारच कमी वेळ उरला आहे. अशा परिस्थितीतही आणि शरद पवारांनी स्वत: सांगूनदेखील इतक्या कमी वेळात पक्षाची धुरा सांभाळण्यात नवाब मलिक इच्छुक नसल्याचे समजते. त्याचे कारण म्हणजे जर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच नवाब मलिक मुंबईचे अध्यक्ष म्हणून नको असतील, तर तिकीट वाटपावेळी पुन्हा गटातटाचे राजकारण केले जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी भिती राष्ट्रवादीच्याच वरीष्ठ वर्तुळात व्यक्त होत आहे. एकीकडे जयंत पाटील यांनी पुण्याच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या काही तासांतच केली. मात्र असे असताना मुंबईच्या अध्यक्ष निवडीसाठी जयंत पाटील यांना वेळ मिळत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एकीकडे ही सर्व चर्चा सुरू असतानाच नवाब मलिक यांनीच आपल्याला निवडणूक लढवायची असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षपद नको असल्याचे पक्षाला कळवल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

जयंत पाटलांचे भाजपशी ‘छुपे अंडरस्टँडिंग’?
दरम्यान, पिंपरी चिंचवड येथे बोलताना जयंत पाटील यांनी, ‘मला गेल्या ५ वर्षांपासून भाजपत येण्याची ऑफर आहे’, असे जाहीर केले होते. मुंबईचा अध्यक्ष न निवडण्यामागे त्यांची आणि भाजपची ही ‘छुपी अंडरस्टँडिंग’ आहे का? असा सवाल आता राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच विचारला जात आहे. मुंबईत सध्या शिवसेना-भाजपला अंगावर घेणारे नवाब मलिक आणि किरण पावसकर हे दोन नेतेच शिल्लक आहेत. निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या सगळ्या युक्त्यांचा उपयोग करण्याचे कसब या दोघांकडेही आहे. शिवाय मागील ५ वर्षांत पावसकर किंवा मलिक यांच्यावर भाजपकडून कोणतेही आरोप झालेले नाहीत. त्यामुळे या दोघांपैकी एकाची निवड केल्यास ते या पदासाठी योग्य ठरेल, असे बोलले जात आहे. मुंबईचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले जयंत पाटील आणि सचिन अहिर या दोन्ही नेत्यांचे घनिष्ठ संबंध असल्यानेच अहिर राजीनामा न देता शिवसेनेत प्रवेश करतात आणि त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. हे गौडबंगाल काय? असा सवाल मुंबईतल्याच एका माजी नगरसेवकाने विचारला आहे. महिला प्रदेशाध्याप्रमाणेच मुंबईचा अध्यक्ष हेसुद्धा महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते रिकामे ठेवण्यात जयंत पाटील यांचा नक्की काय स्वार्थ आहे? असा सवाल आता विचारला जात आहे.

माध्यमांना चुकीची माहिती -जयंत पाटील
“नवाब मलिक हे माझ्यासोबत प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे मुंबई अध्यक्ष कुणाला करायचे यावर पक्षात अद्याप चर्चा सुरु आहे. मी मुंबईत येण्याची वाट पाहत होतो. आज मुंबईत असल्यामुळे सर्वांशी सल्लामसलत करुन निर्णय घेऊ, असे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच नवाब मलिक यांना मुंबई अध्यक्षपद देण्यासाठी शरद पवारांनी फोन केला होता का? असा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले की, “पवार साहेबांनी सांगितलेली गोष्टच पक्षात होते. त्यामुळे कुणाचेही नाव थांबविलेले नाही. माध्यमांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली असावी.”

मला निवडणूक लढायची आहे. मी वेळ देऊ शकणार नाही. मला जबाबदारी नको असे मी पक्षाला कळवले आहे. म्हणून ते पद रिक्त आहे. माझी त्या पदासाठी नेमणूक झालीच नव्हती.
– नवाब मलिक, मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -