Homeमहाराष्ट्रDavos Summit : यासाठी दावोसला जायची काय गरज, अंबादास दानवे यांचा सरकारला...

Davos Summit : यासाठी दावोसला जायची काय गरज, अंबादास दानवे यांचा सरकारला सवाल

Subscribe

पहिल्या दोन दिवसांत महाराष्ट्राशी संबंधित आजवरचे सर्वाधिक करार झाल्याने दावोसमध्ये इतिहास घडल्याचे सांगितले जात असले तरी हे सामंजस्य करार ज्या कंपन्यांबरोबर केले गेले त्या बहुतांश सर्व कंपन्या भारतातीलच आहेत, असे दानवे यांचे म्हणणे आहे. मग असं असताना, या कंपन्यांबरोबर करार करायला दावोस दौऱ्याची गरज काय होती, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Ambadas Danve on Davos Summit : मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने दोन दिवसांत 16 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे एकूण 54 सामंजस्य करार केले आहेत. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा दावा केला जात आहे. हा महाराष्ट्राच्या दृष्टीने विक्रम असल्याचे सांगण्यात येते. मात्र, यातील बहुतांश कंपन्या महाराष्ट्रातील असून त्याचे मुख्यालय मुंबईत आहेत. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी फडणवीस यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत हेसुद्धा दावोस दौऱ्यावर गेले आहेत. (what is the need to go to davos for this ambadas danve criticises mahayuti government over davos summit)

स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने गुंतवणुकीचा विक्रम नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत 6 लाख 25 हजार 457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले. गडचिरोलीचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पहिला सामंजस्य करार हा गडचिरोलीसाठी केला.

पहिल्या दोन दिवसांत महाराष्ट्राशी संबंधित आजवरचे सर्वाधिक करार झाल्याने दावोसमध्ये इतिहास घडल्याचे सांगितले जात असले तरी हे सामंजस्य करार ज्या कंपन्यांबरोबर केले गेले त्या बहुतांश सर्व कंपन्या भारतातीलच आहेत, असे दानवे यांचे म्हणणे आहे. मग असं असताना, या कंपन्यांबरोबर करार करायला दावोस दौऱ्याची गरज काय होती, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी दावोसमधील महाराष्ट्राच्या स्टॉलकडे ढुंकूनही पाहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा – SS UBT Vs BJP : भाजपच्या शहा – फडणवीसी राजकारण्यांनी महाराष्ट्र गलितगात्र केला, ठाकरे संतापले

जगभरातील परदेशी कंपन्या दावोसमध्ये आल्या आहेत, परंतु त्यापैकी कुणालाही महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यात रस नसल्याचे दिसले आहे. पहिल्या दिवशी झालेल्या करारात बहुतेक सर्व कंपन्या या भारतातीलच आहेत. त्यांच्याशीच जर करार करायचे होते, तर ते इथे राहूनही झाले असते. मग त्यासाठी दावोसमध्ये जाऊन करार करण्यामागे नेमका उद्देश काय होता, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. परदेशी कंपन्या महाराष्ट्रात येण्यास का तयार नाहीत, असा सवालही त्यांनी केला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये अंबादास दानवे यांनी पहिल्या दिवशी ज्या कंपन्यांशी करार झाले आहेत, त्यांची यादीच दिली आहे. ते म्हणतात, यात एकूण 29 कंपन्या आहेत आणि त्यात केवळ एकच परदेशी कंपनी आहे. उर्वरित 28 कंपन्या या हिंदुस्थानातील आहेत. या 28 पैकी 20 तर महाराष्ट्रातील असल्याचे सांगतानाच या 20 पैकी 15 मुंबई, 4 पुणे तर एक ठाण्यात आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Congress Vs Mahayuti : दिखावा हा महायुती सरकारच्या कार्यपद्धतीचा भाग, सचिन सावंत यांची टीका

यासोबतच गतवर्षी झालेल्या सामंजस्य करारातील किती करार आतापर्यंत अंमलात आले आहेत हे उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जाहिररित्या सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. हा आकडा 20-25 टक्क्यांपेक्षा अधिक नक्कीच नसणार, असेही ठोसपणे सांगितले.