घरमहाराष्ट्रपोलिसांच्या भंगार दुचाकींचं करायचं काय ?

पोलिसांच्या भंगार दुचाकींचं करायचं काय ?

Subscribe

ठाणे शहर स्मार्ट सिटी व्हावे म्हणून ठामपा प्रशासन प्रयत्नशील आहे. या स्मार्ट शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन अद्यावत असणे आवश्यक आहे. अत्याधुनिक बाईकच्या माध्यमातून एखाद्या घटनास्थळी पोलिसांना तात्काळ पोहचणे आणि शहरात गस्त घालणे सोपे जाणार आहे. असा दावा करीत ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पोलीस विभागाला दुचाकी १५ बुलेट्स दिल्या. मात्र ठाणे महानगर पालिका आयुक्तांनी पोलीस विभागात पडून असलेल्या जुन्या भंगार बुलेटकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. ठाणे पोलीस आयुक्तांच्या मुख्यालयाशेजारी पडून असलेल्या या बुलेटचा वापर किती दिवस करण्यात आला, हा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. या बुलेट्सचं करायचे काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांसाठी बुलेट खरेदीच्या प्रस्तावाला महापौरांसह नगरसेवकांनीही विरोध केला होता. मात्र आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न करून या प्रकरणी आयुक्तांनी आपल्या अधिपत्याखाली आपण कोणतेही निर्णय घेऊ शकतो. प्रसंगी विशेषाधिकार वापरूनही आपण आपले अस्तित्व अबाधित राखू शकतो, हे दाखवून दिले आणि विशेषाधिकारामार्फत बुलेट दुचाकी खरेदीचा प्रस्ताव तात्काळ पास केला. यामुळे नगरसेवक आणि प्रशासन यांच्यातील संघर्षाला मोठे वळण लागले होते.

- Advertisement -

वास्तविक बुलेट खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय नगरसेवकांनी व्यक्त केल्यामुळेच त्याला केवळ स्थगिती देण्यात आली होती. तो रद्द करण्यात आला नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ही प्रक्रिया पूर्ववत करावी, असा नगरसेवकांचा आग्रह होता. त्याकडे दुर्लक्ष करीत आयुक्तांच्या आदेशानेच ही प्रक्रिया तातडीने उरकण्यात आली. प्रशासनाचा बुलेट खरेदीचा प्रस्ताव नगरसेवकांनी फेटाळला असताना आयुक्तांनी स्वतःच्या आर्थिक अधिकारात ही खरेदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. पोलीस बिटमार्शलकरता १५ बुलेट अत्याधुनिक फिटिंगसह ठाणे पोलीस विभागाला देण्यात आल्या. परंतु ठाणे पोलीस आयुक्त मुख्यालयाच्या शेजारीच पडून असलेल्या भंगार अवस्थेतील दुचाकी बुलेटबाबत मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. त्याबद्दल पोलीस प्रशासन आणि ठाणे महानगर पालिका प्रशासनही गप्प का, असा सवाल ठाणेकरांना पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -