घरक्राइमकसली आली भाविकांची सोय? लॉजेसमध्ये चक्क कुंटणखाने

कसली आली भाविकांची सोय? लॉजेसमध्ये चक्क कुंटणखाने

Subscribe
नाशिक-त्र्यंबक रोडवर भाविकांच्या सोयीच्या नावाखाली बांधलेले लॉजिंगमध्ये कुंटणखाने सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी काही लॉजचालकांकडून महाविद्यालयीन तरुणींचाही वापर केला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही लॉजिंगवर तरुणी आणि महिलांचा मुक्त संचार असतो तर  काही ठिकाणी ग्राहकांच्या  सोयीनुसार तरुणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा अनैतिक व्यवसायामुळे त्र्यंबक रोड जणू  अघोषित ‘रेड लाईट एरिया’ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्रंबक रस्त्यावरील बहुतांश लॉजमध्ये राजरोसपणे कुंटणखाने चालवली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. भाविकांसाठी बांधलेले लॉजिंग  अनैतिक व्यापारांसाठी उपयोगात आणले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही लॉजिंगमध्ये देह व्यापार करणार्‍या महिलांचा मुक्त संचार असून, काही ठिकाणी मात्र ग्राहकांच्या सोयीनुसार मुलींना बोलविण्यात येते. या व्यवसायात परप्रांतीय तरुणी आणि महिलांचा समावेश अधिक आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महाविद्यालयीन अल्पवयीन तरुणींचा देखील वापर या व्यवसायासाठी करून घेतला जात आहे. काही महाविद्यालयीन तरुणी  मौजमजा करण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी या व्यवसायाकडे आकर्षित झाल्याचे बोलले जात आहे. त्र्यंबक रस्त्यावरील पावलोपावली असलेले लॉजिंग यासाठी कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. अनेक लॉजिंगमध्ये काही राजकीय पदाधिकार्‍यांचा राबता असून, या पदाधिकार्‍यांची बडदास्त राखण्यासाठी काही लॉजिंग चालक तरुणींना बोलावत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यामुळे परिसरातील तरुण, तरुणींवर त्याचा विपरीत परिणाम  होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लॉजिंगमध्ये चालणार्‍या गैरप्रकारांमुळे त्र्यंंबक रस्त्याची प्रतिष्ठा मलीन होत असून, विरोध करणार्‍यांवर दादागिरी केली जात आहे.

लॉजमध्ये गुन्हेगारांचाही वावर

अशा अनैतिक प्रकारांमुळे या ठिकाणी  गुन्हेगारांचा वावर देखील वाढला आहे. गंभीर गुन्ह्यातील अनेक  आरोपी या लॉजिंगच्या आश्रयाला येत असतात. त्यामुळे अनेकदा या ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. या लॉजिंगवर तरुण-तरुणींचे देखील अनेक वाद होत असून, पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील गैरप्रकारांना आळा बसेल का? असा प्रश्न विचारला जात आहे.

नाशिकमधील वेश्या लॉजेसमध्ये 

नाशिक शहरातील भद्रकाली, विनयनगर आणि पंचवटी परिसरातील ‘रेड लाईट एरिया’ बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे येथे काम करणार्‍या वेश्यांनी लॉजेसचा सहारा घेतल्याचे बोलले जाते. या वेश्यांच्या माध्यमातून लॉजचालक लाखो रुपयांची कमाई करत असल्याचेही दिसून येते.

पार्ट्यांसाठीही बोलावले जाते तरुणींना

- Advertisement -
उच्चभ्रू वर्गातील अनेकांचे फार्म हाऊस त्र्यंबक रोड परिसरात आहेत. यातील काही आंबट शौकीनांनी ‘बाई आणि बाटली’साठीच फार्म हाऊस बांधल्याचे दिसून येते. या फार्म हाऊसमध्ये पार्ट्यांसाठी परिसरातील काही लॉजेसमधूनच मुली आणल्या जातात, असे समजते.

चांगले लॉजचालकही बदनाम

त्र्यंबकरोडवरील सर्वच लॉजेसमध्ये अनैतिक व्यवसाय  केला जातो असे नाही. काही लॉज चालक नैतीक मार्गाने व्यवसाय करतात. परंतु पैशांसाठी नितीमत्तेला वेशीला टांगणार्‍या काही लॉजचालकांमुळे चांगला व्यवसाय करणार्‍यांचीही बदनामी होत आहे. त्यामुळे पोलिसांनीच लक्ष घालून येथील अवैध व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी आता चांगल्या पद्धतीने व्यवसाय करणार्‍या लॉज चालकांकडून होत आहे.

 त्र्यंबकरोडवरील लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायामुळे एक मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. या लॉजिंगचा गैरवापर शाळकरी विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत केला जातो. या लॉजिंगमुळे परिसरातील शाळा, महाविद्यालयातील मुलींनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘आपलं महानगर’ ‘अनैतिकतेचे लॉजिंग’ मालिका सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील आपल्या प्रतिक्रिया ९०२२५५७३२६ या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर पाठवाव्यात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -