मुंबई : आपल्या समाजात अजूनही भेदभाव आहे. जोपर्यंत ही विषमता आहे, तोपर्यंत आरक्षण सुरूच राहिले पाहिजे. संविधानात दिलेल्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यावरून, सरकार अडचणीत आले की संघ असा धावून येतो, असे सांगत काँग्रेसने शरसंधान केले आहे.
हेही वाचा – Maratha Reservation : ‘वंशावळ दस्तावेज’ शब्दात सुधारणा करेपर्यंत आंदोलन सुरुच राहाणार – मनोज जरांगे
मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 1 सप्टेंबर 2023 पोलिसांकडून या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. त्याबद्दल राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारची बाजू स्पष्ट केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल सरकारच्यावतीने माफी मागितली.
त्या पाठोपाठ सरसंघचालक मोहन भागवत यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. समाजव्यवस्थेत आम्ही आमच्या बांधवांना मागे ठेवले. आम्ही त्यांची काळजी घेतली नाही आणि हे जवळपास 2000 वर्षे चालू राहिले. मग आपण आणखी 200 वर्षे काही समस्यांना तोंड का देऊ शकत नाही? जोपर्यंत आपण त्यांना समानता देत नाही, तोपर्यंत त्यांना काही विशेष उपाययोजना लागू कराव्याच लागतील. आरक्षण हे त्यापैकीच एक आहे. या कारणास्तव तोपर्यंत आरक्षण सुरूच ठेवावे, असे मोहन भागवत यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे.
हेही वाचा – शिवसेनेची ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हीच भूमिका आहे आणि राहणार, ठाकरे गटाने ठणकावले
यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शरसंधान केले आहे. मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊन लढणारी संस्था सेव्ह मेरिट सेव्ह नेशन (Save Merit Save Nation) या संघटनेमध्ये संघाचे व भाजपाचे पदाधिकारी होते. दोन तोंडांनी बोलणे ही संघाच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. सरकार अडचणीत आले की, संघ असा धावून येतो. एवढी वर्षे आरक्षणाला विरोध का केला? ते सांगणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे.