राज्यपालांनी केलेली मदत तुटपुंजी; सरसकट मदत करण्याची विरोधकांची मागणी

काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल असे आश्वासन अशोक चव्हाण यांनी दिले आहे. 

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आजच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत घोषित केली आहे. पण मिळणारी मदत तुटपुंजी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रुपयांची तातडीची मदत करण्याची मागणी शिवसेनेसह विरोधकांनी केली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांनीसुद्धा टिका केली आहे. एवढेच नाही तर काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल असे आश्वासन अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

मदत तुटपुंजी – एकनाथ शिंदे

ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्यपालांकडून जाहीर झालेली खरीप पिकांना प्रति हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी १८ हजार रुपये मदत तुटपुंजी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी दिली. एवढ्या मदतीतून शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार नाही असा दावा करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागणीनुसार नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी २५ हजार रुपये तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या सोबतच, नुकसान झालेल्या शेतातील जुन्या पिकांचे अवशेष बाहेर काढणे, शेतातील गवत व इतर कचरा साफ करून रब्बी हंगामसाठी शेती पेरणीयोग्य करण्यासाठी मनरेगा/ रोजगार हमीतून मदत करण्यात यावी अशा मागण्या केल्या आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या उपरोक्त मागण्याचा गांभीर्याने विचार करून वाढीव मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

काँग्रेसप्रणित नवीन सरकार आल्यास अतिरिक्त मदत

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीवर टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मदत तुटपुंजी असली तरी प्रशासनाने तातडीने ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल असे आश्वासन अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

राज्यपालांनी निर्णयाचा फेरविचार करावा

गेल्या अनेक दिवसांपून सरकार मदत करेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी असून त्यात मशागतीचा खर्चही निघणार नाही. म्हणूनच राज्यपालांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि या मदतीत भरीव वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

राज्यपालांनी काळी टोपी घालून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले आहेत.