घर उत्तर महाराष्ट्र ...तेव्हा घोलपांची निष्ठा कुठे होती?; छगन भुजबळांचा घणाघात

…तेव्हा घोलपांची निष्ठा कुठे होती?; छगन भुजबळांचा घणाघात

Subscribe

नाशिक : शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर वर्षभरापूर्वी भुजबळांचा सेना प्रवेश आपण रोखल्याचा गौप्यस्फोट केला. याबाबत पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी कधीही शिवसेना प्रवेशासाठी कुणाकडे गेलो नाही. आज जे पक्षावर निष्ठा दाखवत आहेत त्यांनीच ९१ साली शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाण्यासाठी ज्या ३६ आमदारांनी सह्या केल्या त्यात त्यांची सही सर्वात वर होती असे सांगत घोलपांवर शरसंधान साधले.

वर्षभरापूर्वी छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार होते, मात्र मी दिल्लीत असताना ही गोष्ट समजली आणि त्यानंतर लागलीच दिल्लीहून मुंबई गाठत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि चर्चेअंती भुजबळांचा प्रवेश रोखल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते बबनराव घोलप यांनी काही दिवसांपूर्वी केला. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, मी आणि माझी मुलं यांनीही कधीही आम्हाला शिवसेनेत प्रवेश करायचा आहे असे कुणालाही म्हटलेलो नाही.कुणाकडे आम्ही गेलो नाही. मधले काही कार्यकर्ते चर्चा करत असतील तर मला माहित नाही. कारण नसतांना त्यांनी हा विषय काढला. त्यांना शिवसेना सोडून दुसर्‍या पक्षात जायचे आहे त्यांनी जावे. परंतु ते निष्ठावान असल्याचे दाखवतात. १९९१ साली शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाण्यामध्ये ज्या ३६ जणांनी सह्या केल्या त्यात घोलपांची स्वाक्षरी सर्वात वरती होती. त्यामुळे त्यांनी निष्ठेच्या गोष्टी करू नये असा टोला भुजबळांनी लगावला.

- Advertisement -

ओबीसींचे दहा टक्के आरक्षण वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळेंनी सभागृहात केली आहे. याबाबत बोलतांना ते म्हणाले, चांगली गोष्ट आहे. फडणवीस यांनी जो कायदा केला त्यात १२ ते १३ टक्के तरतूद मान्य केली होती पण सर्वोच्च न्यायालयात अडचण निर्माण झाली. मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी आम्ही पूर्वीपासून करत आहोत परंतु कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते देण्यात यावे. त्यांना देखील अडचणी आहेत शिक्षणाच्या अडचणी, आर्थिक अडचणी आहेत त्यामुळे त्यांना वेगळे आरक्षण द्यावे ही शेवाळे यांची मागणी योग्य आहे. ओबीसी समाजानेही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे जर चर्चेची मागणी केली तर ते चर्चा करतील. अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रयांनीही वारंवार हे स्पष्ट केले आहे की, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही. परंतु ओबीसी समाजामध्ये एक काळजी निर्माण झाली आहे की काय होईल, काही उलट सुलट होईल का पण सरकार सांगत आहे तसे काही होणार नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -