आरोप करणारे तेव्हा कुठे होते ? चंद्रकांत मोरे यांचा सवाल

‘हाती चलता है कुत्ता भौकता है’ यावर खूप काही लक्ष देण्याचे कारण नाही : त्र्यंबक गुरूपीठाचे ट्रस्टी चंद्रकांत मोरे

नाशिक : गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे आज वयाच्या ७० व्या वर्षीही लोकांमध्ये जाऊन अठरा-अठरा तास सेवाकार्य करत आहेत. आमची वडिलोपार्जित १५० एकर बागायती शेती आहे. शेती करूनही आम्ही आमचा उदरनिर्वाह करू शकतो. याकरीता धर्माच्या नावाने अपहार करण्याची आवश्यकता नाही. भारतीय हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी हे सेवा कार्य गुरूमाऊलींमार्फत जगभरात चालवले जात आहे. परंतु काही लोक स्वार्थापोटी म्हणा किंवा व्देषातून आज आरोप करत आहेत. अतिशय खडतर प्रवासातून गुरूमाऊलींनी हे कार्य सुरू केले मग त्यावेळी आज आरोप करणारे कुठे होते? असा सवाल त्र्यंबकेश्वर गुरूपीठाचे ट्रस्टी चंद्रकांत मोरे यांनी उपस्थित करत अपहाराच्या तक्रारीचे खंडन केले.

दिंडोरी येथील प्रख्यात स्वामी समर्थ गुरूपीठात ५० कोटींचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आल्याने सेवेकर्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोट्यवधी रुपयांची कामे विनानिविदा करून संस्थेच्या निधीचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन दिवसांपासून याबाबत ट्रस्टींकडून कोणताही सविस्तर खुलासा करण्यात आला नाही, मात्र सोमवारी त्र्यंबकेश्वर गुरूपीठाचे ट्रस्टी चंद्रकांत मोरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत या प्रकरणी खुलासा केला.

यावेळी मोरे म्हणाले की, गुरूमाऊलींच्या कार्यातून अनेकांचे जीवन सुकर झाले आहे. संस्कार अन् संस्कृती रक्षणाचे कार्य गुरूमाऊलींच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आज नव्हे तर तीन पिढ्यांपासून सेवेकरी या कार्यात जोडले गेले आहेत. राहिला विषय अपहाराचा, त्र्यंबकेश्वरमध्ये आमची १५० एकरपेक्षा अधिक वडिलोपार्जित बागायती शेती आहे. आम्ही शेती जरी केली, तरी आमचा उदरनिर्वाह होऊ शकतो. नव्हे तर तो होतो आहे. अध्यात्मिक संस्थेतून स्वार्थ करण्याचा किंवा अपहार करण्याचे कारण नाही. गुरूपीठाचे सर्व कार्य निःशुल्क आहे. निधीकरीता कोणताही सक्ती केली जात नसल्याचे ते म्हणाले. १ नोव्हेंबर १९९२ रोजी या ठिकाणी एका पत्र्याच्या शेडमधून या सेवा कार्याला सुरुवात झाली. आम्ही शिक्षण सोडून इथे आलो. खडतर प्रवासातून हे कार्य उभे केले. सेवाकार्य चार भिंतीत राहून होऊ शकत नाही, मग आरोप करणारे त्यावेळी कोठे होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हाथी चलता है, कुत्ते भोंकते है !

त्र्यंबकेश्वरच्या पुरोहीतांकडूनही या सेवाकार्याला विरोध करण्यात आला याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘कालै तस्मे नमः’ काही गोष्टी काळानुसार बदलायचे असते. हिंदू संस्कृती जर जगाच्या पटलावर पोहचवायची असेल तर ॠषी मुनींचे ग्रंथ ज्ञान विज्ञान पुढे आणणे गरजेचे आहे. धर्मक्रांतीसाठी पहिले पाऊल कुणाला तर टाकावे लागेल. पुण्यामध्ये सावित्री बाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. पण फुले नाव म्हणून लोकांनी त्यांच्यावर फुले टाकली नाही तर शेण फेकले. त्यामुळे ‘हाती चलता है कुत्ता भौकता है’ यावर खूप काही लक्ष देण्याचे कारण नाही. समाजहीत, धर्माच्या हिताकरीता, राष्ट्रीय एकोपा कसा निर्माण करता येईल, सर्व जाती पंथ कसा एकत्रित करता येईल. हाच आपला प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले.