पुराच्या पाण्यातून गाडी काढण्याचे धाडस बेतले जीवावर, 8 जण वाहून गेल्याची भीती

नागपूर जिल्ह्यातील केळवद पोलिस ठाणे परिसरातील नाल्याला पूर आला आहे. दरम्यान या पुराच्या पाण्यात एका स्कॉर्पिओ चालकाने गाडी पुलावरुन नेली. यावेळी पाण्याच्या धक्क्यामुळे गाडी नाल्याच्या प्रवाहा वाहत गेली.

Symbolic photograph
प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर जिल्ह्यातील केळवद पोलिस ठाणे परिसरातील नाल्याला पूर आला आहे. या पुरामुळे नाल्यावरील पुलावर पाणी आले आहे. दरम्यान या पुराच्या पाण्यात एका स्कॉर्पिओ चालकाने गाडी पुलावरुन नेली. यावेळी पाण्याच्या धक्क्यामुळे गाडी नाल्याच्या प्रवाहा वाहत गेली असून यात आठ जण वहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सतरापूर आणि नांदा गावादरम्यान वाहणाऱ्या नाल्याला आज पूर आल होता. त्यामुळे नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत होते. दरम्यान एक स्कॉर्पिओ चालकाने आठ लोकांसह पुलावरून गाडी काढण्याचे धाडस केले. पण तेवढ्यात पाण्याचा लोंढा आला आणि पाण्याच्या धक्क्यामुळे स्कॉर्पिओ गाडी पुलावरु नाल्याच्या प्रवाहात वाहत गेली.

सध्या पुलापासून काही अंतरावर स्कॉर्पिओ कार पाण्यात अडकलेली दिसत आहे. मात्र, त्या गाडीत बसलेले प्रवासी वाहून गेले की अजूनही स्कॉर्पिओमध्ये आहेत हे समजू शकलेले नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. स्कॉर्पिओमधील प्रवासी मध्य प्रदेशातील पांढूर्णा परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

गडचिरोलीत जोरदार पाऊस –

गडचिरोलीत पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील आलापल्ली शहरात पूर आला आहे. त्यामुळे तेथील काही गावांचा संपर्क तुटला आहे. परिणामी तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावातही पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान गडचिरोलीत एक महिन्याच्या बाळासह 70 पेक्षा जास्त नागरिकांना पूर परिस्थितीतून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले आहे. अहेरी तालुक्यातील आलापल्लीला लागून असलेल्या नागेपल्लीत पूर परिस्थितीत निर्माण झाली आहे. तिथे अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरु आहे.