घरमहाराष्ट्रसंजय राऊत आरोप करत असलेला राजा ठाकूर नेमका कोण?

संजय राऊत आरोप करत असलेला राजा ठाकूर नेमका कोण?

Subscribe

राजा ठाकूर हा ठाण्यातील कुख्यात गुंड असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच ठाणे, कळवा आणि मुंब्रा भागात या गुंडाची मोठी दहशत आहे

मुंबईः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची खळबळजनक माहिती दिली आहे. माझ्यावर हल्ला करण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर या गुंडाला सुपारी दिल्याचं पत्रच मुंबई पोलीस आयुक्तांना त्यांनी दिलं आहे. त्यामुळे आता संजय राऊतांनी पत्रात उल्लेख केलेला श्रीकांत शिंदेंच्या जवळचा तो राजा ठाकूर गुंड कोण, याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राजा ठाकूर हा ठाण्यातील कुख्यात गुंड असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच ठाणे, कळवा आणि मुंब्रा भागात या गुंडाची मोठी दहशत आहे. टोळीच्या माध्यमातून दहशत पसरवणे आणि हत्येच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दीपक पाटील गटाशी त्यांचं वैर असून, दीपक पाटील यांचा काटा राजा ठाकूर यांनीच काढल्याची गुन्हे विश्वात चर्चा आहे. ठाण्यातील विटावा उड्डाणपुलाखाली जानेवारी 2011 मध्ये दीपक पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येप्रकरणी राजा ठाकूर याला अटक करून जन्मठेप सुनावली होती. त्यानंतर एप्रिल 2019 नंतर तो जामिनावर बाहेर आलाय. ठाण्यात शिंदे पितापुत्रांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजा ठाकूर याने भव्य कबड्डी सामान्यांचे आयोजन केले होते, तसेच ठाण्यात शिंदे यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग झळकवले होते. तेव्हापासून राजा ठाकूर चर्चेत आला आहे. त्यात आता संजय राऊत यांनी आरोप केल्याने राजा ठाकूर पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.

- Advertisement -

खरं तर राजा ठाकूर हा खासदार श्रीकांत शिंदे यांचा जवळचा समजला जातो. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अनेक कार्यक्रमांत राजा ठाकूर आणि सिद्धू अभंगे यांसारखे कुख्यात गुंड पाहायला मिळतात. खरं तर सिद्धू अभंगे हासुद्धा ठाण्यातील कुप्रसिद्ध गुंड आहे. सिद्धू अभंगे यू ट्युबचा भाई म्हणूनही प्रसिद्ध आहे. सिद्धू अभंगे याला दोन वर्षांसाठी ठाण्यातून तडीपार करण्यात आलं होतं. खंडणी उकळणे, खुनाचा गंभीर गुन्हा, बेकायदेशीर हत्यारं बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, हाणामारी आणि अमली पदार्थ तस्करी करणे या आरोपांखाली सिद्धू अभंगेविरोधात ठाण्यातील कोपरी, चितळसर, वर्तकनगर आदी पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. सिद्धू अभंगे एका मंत्र्याच्या जवळचा समजला जातो. सिद्धू अभंगे आणि अजय पासी यांची गँग असून, राजा ठाकूरही त्यांच्याच गँगचा सदस्य असल्याचं सांगितलं जातंय.

राजा ठाकूर यानंसुद्धा संजय राऊतांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या इज्जतीची वाट लावतायत, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय, माझी कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. संजय राऊत कोणाबद्दल काहीही बोलू शकतो. मी याबाबत तक्रार करणार असल्याचंही राजा ठाकूर म्हणाला आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी केलेले आरोप शिंदे गटा (शिवसेना)नेही फेटाळून लावले आहेत. “संजय राऊत खोटे आरोप करतात. श्रीकांत शिंदे यांना बदनाम करू पाहतात. कोणतेही पुरावे नसताना नाहक आरोप करण्याचं काम केलं जात आहे,” असा पलटवार शंभूराज देसाई यांनी केलाय.

- Advertisement -

खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांना यांच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली होती. आव्हाडांच्या कुटुंबीयांना संपवण्यासाठी तिहार तुरुंगातील कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर उर्फ बाबाजी याला सुपारी दिल्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे त्या क्लिपमध्ये ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे आता मुंबई, ठाण्यात गुंड राजा ठाकूर, कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर उर्फ बाबाजी ठाकूर आणि सिद्धू अभंगे यांच्या रूपात टोळीयुद्ध भडकण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचाः कोश्यारींचा दावा योग्य, ठाकरेंच्या इगोमुळे पत्राचा फॉरमॅट..; देवेंद्र फडणवीसांची टीका

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -